बनावट चलन छपाई प्रकरण

रद्दबातल नोटांची छपाई करत नवीन नोटा उकळण्याचा डाव रचणाऱ्या ११ संशयितांच्या बँक खात्यांची माहिती तपास यंत्रणेने संकलीत केली आहे. त्यात नोटा छपाईत मुख्य भूमिका निभावणारा राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी छबु नागरेची सर्वाधिक खाती असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील नऊ खाती वैयक्तिक, पत्नी, नातेवाईकांच्या नावे तसेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने विश्वास बँकेच्या एकाच शाखेत असून त्यात ५५ लाखहून अधिकची रक्कम असल्याचे समोर आले आहे. ही बँकही राष्ट्रवादीशी घनिष्ट संबंध असणाऱ्याची आहे. उपरोक्त सर्व बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मागील आठवडय़ात एक कोटी ३५ लाखाचे बनावट आणि एक लाख ८० हजाराचे खरे चलन नोटा अदलीबदलीसाठी निघालेल्या ११ जणांना शहर पोलिसांनी अटक केली होती. जुन्या नोटा देऊन चलनातील नव्या नोटा उकळण्याचा डाव नाशिकसह मुंबई, पुण्याच्या या संशयितांनी रचला. त्यासाठी रद्दबातल झालेल्या ५०० व एक हजाराच्या बनावट नोटांची छपाई केली. त्या नोटांचे बंडल वेष्टित करताना वरील व खालील भागात तीन ते चार खऱ्या नोटा लावून शंका येणार नाही याची काळजी घेतली. या प्रकरणी अटक झालेला नागरे हा माजी मंत्री छगन भुजबळांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी तथा वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव तुकाराम पाटील, रमेश पांगारकर, संतोष गायकवाड, प्रभाकर घरटे (सर्व रा. नाशिक), ईश्वर परमार, राकेश कारखुर, नीलेश लायसे, गौतम चंद्रकांत जाधव, प्रवीण मांढरे (सर्व रा. मुंबई, ठाणे) व संदीप सस्ते (पुणे) यांना अटक झाली होती. संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरूवारी संपुष्टात येत आहे. पोलिसांनी संशयितांच्या बँक खात्याची छाननी सुरू केली. त्यात एकटा नागरे, त्याची पत्नी व नातेवाईकांची बँकांमध्ये जवळपास १२ खाती आहेत. त्यातील नऊ खाती ही एकटय़ा विश्वास सहकारी बँकेत उघडली होती. या खात्यांत ५५ लाखाहून अधिकची रक्कम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कृष्णा पॉवर व्हेंचर्स, कृष्णा एंटरप्रायजेस, अ‍ॅक्सीस मायक्रो फायनान्स अशा नावाने ही खाती आहेत. इतरही संशयितांच्या बँक खात्याची माहिती प्राप्त झाली असून ती गोठवण्याची कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, नागरेने बनावट नोटांची छपाई खुटवडनगरमधील आपल्या सदनिकेत केली. छपाईचे ज्ञान असणाऱ्या एका व्यक्तीची त्याने मदत घेतली. या सदनिकेत संबंधिताला वास्तव्यास जागा दिली. हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित व्यक्ती फरार झाली आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.