नाशिकमध्ये भुजबळ-पिंगळे यांच्या राजकारणात राष्ट्रवादीचे पाय खोलात

दोघेही एकमेकांचे कट्टर वैरी. आपली खासदारकी काढून घेतल्याचा एकाला राग तर निवडणुकीत जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याने दुसराही संतप्त. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने उभयतांना झुंजवत ठेवले. योगायोग म्हणा की अन्य काही, पण दोघांचा मुक्काम सध्या तुरुंगात आहे. या दोन नेत्यांच्या वैयक्तिक स्वार्थाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे पाय मात्र आणखी खोलात गेले आहेत.

छगन भुजबळ आणि देवीदास पिंगळे हे दोघेही राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्य़ातील नेते. महाराष्ट्र सदन इमारतीच्या बांधकामात झालेल्या अनियमिततेबद्दल भुजबळांचा मुक्काम गेले नऊ महिने तुरुंगात आहे. तर नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची ५८ लाखांची रक्कम हडप केल्याबद्दल पिंगळे यांना अलीकडेच अटक झाली.

कृषी उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या नाशिकमध्ये शेतीतील बारीकसारीक माहिती जाणणारा नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पक्षाला जिल्ह्य़ात सहजपणे बस्तान बसविता आले. अर्थात तेव्हा स्थानिक पातळीवरील पक्षाची सूत्रे साहेबांनी मराठा नेत्यांकडे सोपविली होती. पिंगळे हे त्यापैकीच एक. त्यांच्यासह मराठा नेत्यांच्या वर्चस्वाला झटका बसला तो भुजबळांचे जिल्ह्य़ाच्या राजकारणात आगमन झाल्यावर. मुंबईत बाळा नांदगावकर यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्यांनी नशीब आजमावण्यासाठी २००४ मध्ये नाशिक गाठले आणि अल्पावधीत पक्षांतर्गत समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली. काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात उपमुख्यमंत्रिपद भूषविताना जिल्ह्य़ातील सर्व सत्ताकेंद्र त्यांनी ताब्यात घेत आपल्या गटाचा प्रभाव वाढविला. भुजबळांच्या कार्यशैलीमुळे मराठा गटाला वारंवार ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करण्याची वेळ आली. भुजबळ आणि पिंगळे यांच्या वादाला अशीच किनार आहे. उभयतांच्या कलहाला ओबीसी आणि मराठा वादाची किनार होतीच.

[jwplayer E9bP8ako]

भुजबळांच्या पुढाकारातून २००९ मध्ये नाशकात राष्ट्रवादीच्या भव्यदिव्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी वरिष्ठ नेत्यांचा अक्षरश: राजेशाही थाट पाहायला मिळाला. यामुळे पक्षाध्यक्षांनी जाहीर सभेत समीर भुजबळच्या नियोजन कौशल्याचे कौतुक केले. या अधिवेशनासह अन्य कोणत्याही कार्यक्रमात पक्षाचे तत्कालीन खासदार पिंगळे व अन्य स्थानिक नेते केवळ वाढपीच्या भूमिकेत दिसायचे. या अधिवेशनाने तर पिंगळेंचे पुढील लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापले. भुजबळांच्या भव्यदिव्य आयोजनावर भाळलेल्या वरिष्ठांनी पिंगळेंना डावलून समीरला संधी दिली. पक्षाचा निर्णय जिव्हारी लागूनही पिंगळे पक्षात थांबले. मात्र भुजबळांसोबत ते सक्रिय राहिले नाहीत. भुजबळांना थेट आव्हान देणे अशक्य असल्याने मराठा गटाने पडद्यामागून छुप्या कारवाया सुरू केल्या. बरीच वर्षे दमन सहन करणारा मराठा गट २०१४ मध्ये खुद्द भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा त्यांना पराभूत करण्यासाठी सक्रिय झाला. निकालावेळी ‘जे पेराल ते उगवते’ याची प्रचीती भुजबळांनी घेतली. भाजपच्या लाटेत तेदेखील पराभूत झाले. पुढे येवल्यातून सलग तिसरा विजय मिळवीत ते पुन्हा किमान विधानसभेत पोहोचले. मुंबई ते नाशिक भुजबळशाहीचा अलिशान प्रवास भल्याभल्यांचे डोळे दिपविणारा होता. परस्परांना पाण्यात पाहणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांमागे देशात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता शुक्लकाष्ठ लागले आहे.

  1. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ मार्च २०१६ मध्ये छगन भुजबळांनाही अटक झाली. अंमलबजावणी संचालनालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत भुजबळ कुटुंबीयांची डोळे दिपविणारी मालमत्ता समोर आली. तिची मोजदाद करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दमछाक झाली होती.
  2. तशीच स्थिती त्यांचे पक्षातील विरोधक पिंगळेंची आहे. नाशिक बाजार समितीचे सभापती असणाऱ्या पिंगळेंचा कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसची रक्कम हडपण्याचा डाव होता. सर्व कर्मचाऱ्यांची सुमारे ५८ लाखांची रक्कम एकाच वेळी जिल्हा बँकेच्या शाखेतून काढण्यात आली. ही रक्कम पिंगळेंच्या घरी पोहोचवली जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
  3. महिनाभराच्या तपासाअंती पिंगळेंना अटक झाली. या कारवाईनंतर पिंगळेंची कोटय़वधींच्या मालमत्तेचा तपशील समोर आला आहे. पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. भुजबळ व पिंगळे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. पण या कारवायांनी एकाच धाग्यात ते बांधले गेले आहेत.

भुजबळांच्या पुढाकारातून २००९ मध्ये नाशकात राष्ट्रवादीचे भव्यदिव्य अधिवेशन झाले. या अधिवेशनाने पिंगळेंचे लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापले.

[jwplayer FYKP2mlG]