युद्धात सेनापती जायबंदी झाला की, सैन्य सैरभैर होते. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ हे कारागृहात गेल्यावर त्यांच्या समर्थकांची हीच अवस्था झाल्याचे लक्षात येते. कालांतराने भुजबळांसमवेत सावलीसारख्या वावरणाऱ्या कित्येकांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना किंवा भाजपमार्फत आपल्या राजकीय वाटचालीचा मार्ग प्रशस्त केला. बोटावर मोजता येतील असे काही समर्थक आजही राष्ट्रवादीमध्येच आहेत. परंतु काही अपवाद वगळता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेपासून हातचे अंतर राखत शांत बसणे पसंत केले आहे.

भुजबळ कारागृहात गेले आणि त्यांच्या समर्थकांचे वैभव लुप्त झाले. त्यास भुजबळ संस्थापक असलेली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदही अपवाद राहिली नाही. या संघटनेच्या ग्रामीण भागातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर करत स्वार्थ साधण्याचे धोरण ठेवले आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळांपाठोपाठ मार्च २०१६ मध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही अटक झाली होती. या कारवाईला आता दहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. एक तप नाशिकच्या राजकारणात भुजबळांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राष्ट्रवादीची सर्व सूत्रे त्यांच्याच हाती होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समित्या, दूध संघ अशी सर्व सत्ताकेंद्रे ताब्यात घेऊन त्यांनी आपल्या समर्थकांना मोक्याची पदे बहाल केली होती. राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील एकखांबी नेतृत्व कारागृहात गेल्यानंतर स्थानिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्या. तत्पूर्वी, राज्यात सत्तांतर झाल्यापासून जिल्ह्य़ातील त्यांची सत्ताकेंद्रे डळमळीत होऊ लागली होती. सक्तवसुली संचालनालयाने भुजबळांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्या घराची झाडाझडती सुरू केल्यावर समर्थकांनी प्रारंभी आंदोलन करत कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. काळ जसा पुढे सरकला, तशी त्यांची आशा मालवू लागली. नेतृत्वहीन झालेल्या राष्ट्रवादीतील भुजबळ समर्थकांचे नगरपालिका निवडणुकीपासून सुरू झालेले पक्षांतर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत कायम आहे.

मात्र भुजबळनिष्ठा कायम!

पक्षांतराच्या वावटळीत भुजबळ यांचे खंदे समर्थक दिलीप खैरे, राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांच्यासह समता परिषदेशी संबंधित काही जण अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबलेले आहेत. पक्षाचा आमदार म्हणून महापालिका निवडणुकीत जाधव यांना नियोजनात काही अंशी लक्ष घालणे भाग पडले. मात्र उर्वरित समर्थक शांत बसून केवळ भुजबळ निष्ठा जपत आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिका व जिल्हा परिषदेच्या प्रचाराचा नारळ पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी फोडला. त्यांच्या स्वागतार्थ शहर व ग्रामीण भागात लावलेल्या फलकांवरून भुजबळांचे छायाचित्र गायब करण्यात आले होते. यावरून भुजबळ समर्थक आणि उर्वरित पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली. तेव्हापासून भुजबळ गट काहीसा तटस्थ झाला. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या घडामोडीत भुजबळांचे म्हणून ओळखले जाणारे उरलेसुरले पदाधिकारी व कार्यकर्ते निव्वळ बघ्याच्या भूमिकेत आहेत.

पक्षांतराची लाट

राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील एकखांबी नेतृत्व कारागृहात गेल्यानंतर स्थानिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्या. तत्पूर्वी, राज्यात सत्तांतर झाल्यापासून जिल्ह्य़ातील त्यांची सत्ताकेंद्रे डळमळीत होऊ लागली होती.

  • काँग्रेस आघाडीच्या काळात भुजबळांनी म्हाडाचे नाशिक विभागीय अध्यक्षपद जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना दिले होते. त्यांनीही सेनेची वाट पकडली.
  • येवला तालुक्यात नगरपालिका, बाजार समिती, दूध संघ व मजूर फेडरेशन या संस्था भुजबळ व समर्थकांच्या हातातून निसटल्या आहेत.
  • समता परिषदेच्या नांदगाव तालुक्याध्यक्षाने अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. इतर भागातही कमी-अधिक प्रमाणात भुजबळांना मानणाऱ्यांनी आपापली राजकीय वाट धुंडाळत मार्गक्रमण सुरू ठेवले आहे.
  • महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे व भुजबळ यांचे निकटचे संबंध होते. यामुळे चुंबळे यांच्या घरातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यास भुजबळांनी मागे पुढे पाहिले नाही. परंतु आज हेच चुंबळे नगरसेविका असणाऱ्या पत्नीसह शिवसेनावासी झाले आहेत.
  • भुजबळ सत्तेवर असताना त्यांच्या आसपास राहणाऱ्यांमध्ये स्वीकृत नगरसेवक सचिन महाजन यांचा समावेश होता. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष सोडून जाणाऱ्या नगरसेवकांची यादी यापेक्षा मोठी आहे.
  • बनावट नोटा छपाई प्रकरणात राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी छबु नागरे कारागृहात आहे. नाशिकरोड परिसरात भुजबळांच्या विकासकामांचे प्रदर्शन भरवणारा व वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेला पदाधिकारी कैलास मुदलीयार भावाला सेनेत पाठवून कुंपणावर बसलेला आहे. लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी बदललेली समीकरणे लक्षात घेऊन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवबंधन बांधले.
  • आमदार पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघातील मनमाड नगरपालिकेवर गत वेळी राष्ट्रवादीची सत्ता होती. गणेश धात्रक यांना भुजबळांनी नगराध्यक्षपदी विराजमान केले. परंतु निवडणुकीच्या तोंडावर भुजबळांचे निकटवर्तीय म्हणून गणले जाणारे धात्रक राष्ट्रवादीच्या ११ नगरसेवकांना घेऊन शिवसेनेत डेरेदाखल झाले आणि पुन्हा निवडूनही आले.
  • इतकेच नव्हे तर, नगराध्यक्षपदी धात्रक यांच्या मातोश्री पद्मावती या सेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. मनमाडप्रमाणे नांदगाव नगरपालिकेत घडले. गत वेळी नगराध्यक्षपद मिळालेला कवडे गट अंतर्गत राजकारणाला वैतागून सेनेला जाऊन मिळाला व आज याच गटाचे राजेश कवडे नगराध्यक्ष आहेत.
  • भुजबळांच्या येवला मतदारसंघात नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे अधिक नगरसेवक निवडून आले. पण नगराध्यक्षपद गमवावे लागले. या ठिकाणी भुजबळ समर्थक माणिकराव शिंदे आणि अंबादास बनकर यांच्यात सुप्त संघर्ष आहे.