महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार असून शनिवारपासून अर्ज उपलब्ध होणार आहेत. महापौरपद खुल्या गटासाठी असल्याने इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. परिणामी, सत्ताधारी भाजपचा उमेदवार निवडीत कस लागणार आहे. विरोधी शिवसेना मैदानात उतरेल की नाही, हे अद्याप निश्चित नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली, त्याचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाने निश्चित केला आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी होणाऱ्या सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

आरक्षण सोडतीत महापौरपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव झाल्याने सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी महापौरसह इतर महत्त्वाच्या पदाचे आश्वासन दिले गेले होते. भाजपमध्ये प्रबळ इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामध्ये सतीश कुलकर्णी, दिनकर पाटील, उद्धव निमसे, संभाजी मोरुस्कर, शशिकांत जाधव, हिमगौरी आडके आदी इच्छुक आहेत. यातून एकाची निवड करताना माजी मंत्री गिरीश महाजन यांची कसरत होणार आहे.

उमेदवार निवडीत उद्भवणारी नाराजी थोपविणे आणि सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने वेगळा मार्ग पत्करल्याने राज्यातील सत्तेपासून भाजप दुरावला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबतीने सेना राज्यात सत्ता ग्रहण करण्याच्या मार्गावर आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या गट नेत्याने भाजप विरोधात बंडखोरी केली होती. शहरातील एकही जागा भाजपने सेनेला सोडली नव्हती. त्याची खदखद सेनेच्या गोटात आहे. आता युती दुभंगल्याने महापौर निवडणुकीत भाजपची कोंडी करण्याची संधी सेना सोडणार नाही. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर त्यांची भिस्त आहे. राज्यातील फाम्र्युला वापरत विरोधक भाजपला धक्का देण्याचे तंत्र अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेकडून अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर हे इच्छुक असले तरी शिवसेनेने महापौर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे की नाही, याबद्दल अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी वरिष्ठांकडून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असताना तत्पूर्वीच निश्चित झालेली मासिक सर्वसाधारण सभा सोमवारी होईल की नाही, याबद्दल संभ्रम आहे. सत्ताधारी भाजप घाबरून सर्वसाधारण रद्द करण्याच्या विचारात आहे. बहुमत असूनही भाजपचा स्वत:च्या लोकांवर विश्वास नसल्याचे हे द्योतक असल्याकडे बोरस्ते यांनी लक्ष वेधले. महापौर रंजना भानसी यांनी सर्वसाधारण सभेबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे नमूद केले.

महापालिकेतील पक्षीय संख्याबळ

*    भाजप ६५

*    शिवसेना ३४

*    काँग्रेस ६

*    राष्ट्रवादी ६

*    मनसे ५

*    अपक्ष ३