|| चारुशीला कुलकर्णी

आरोग्य यंत्रणेपुढे वाटपाचे संकट

नाशिक : करोना संसर्गातून बरे झालेल्या काही रुग्णांना घरी आल्यावर तसेच काहींना करोनाकाळात ‘म्युकरोमायकोसिस’ या नवीन आजाराचा त्रास होत आहे. जिल्हा परिसरात या रुग्णांची संख्या वाढत असताना या आजारावर उपयुक्त असलेले इंजेक्शन, औषधे यांचा तुटवडा जिल्ह्यात जाणवत असून याचा काळाबाजार होण्यास सुरुवात झाली आहे. शासनाकडून लवकरच इंजेक्शन उपलब्ध होणार असली तरी त्याची संख्या अतिशय कमी असल्याने ती नेमकी कोणाला आणि कशी द्यायची, असा प्रश्न  आरोग्य यंत्रणांना पडला आहे.

करोेनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना उपचारानंतर किंवा उपचार सुरू असताना रुग्णांना वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात अनेकांना ‘म्युकरोमायकोसिस’ आजाराचा त्रास होऊ लागला आहे. ग्रामीण तसेच शहर परिसरात आजाराचा शिरकाव झाल्याने करोना नियंत्रणात गुंतलेली यंत्रणा आता या आजाराला तोंड देण्यासाठी सक्रिय झाली आहे. यासाठी स्वतंत्र कृती समिती गठीत करण्यात आली असली तरी अद्याप आजार आणि त्याविषयी असणारी माहिती याविषयी अनभिज्ञता आहे. जिल्ह्यात या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. परंतु या आजारावर उपयुक्त असलेले  एम्फोटेरेसिन बी इंजेक्शन तसेच पोसाकोनाझोले गोळ्यांचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयांमध्ये इंजेक्शन नसताना शहरातील काही औषधालयांमध्ये त्याची जादा दराने विक्री होत आहे. एक इंजेक्शन तसेच गोळ्यांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना दुप्पट-तिप्पट पैसे द्यावे लागत आहे.

औैषधांचा काळाबाजार होत असताना प्रशासन मात्र यापासून अनभिज्ञ आहे. याविषयी रुग्णाच्या नातेवाईकांनी माहिती दिली. एका औषधालयांमध्ये एक इंजेक्शन १५ हजार रुपयांना घेतले. हा सारा खर्च आवाक्याबाहेर जात असून यासाठी मदतीची आवश्यकता आहे. शासनाने ठोस पाऊले उचलावी, अशी मागणी केली. एका ३० वर्षांच्या रुग्णाने आपले दु:ख मांडले. डोळ्यावर उपचार सुरू असून इंजेक्शन न मिळाल्याने हा संसर्ग शरीरात पसरण्यास सुरुवात झाली आहे. आता हनुवटीला झाला आहे. हनुवटीची शस्त्रक्रिया या दोन दिवसांत होणार आहे.

इंजेक्शन न मिळाल्यास हा संसर्ग शरीरात वेगाने पसरण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. या आजारांतर्गत मला १०० इंजेक्शनचे सत्र सांगितले आहे. इंजेक्शन मिळण्यात मारामार असताना उपचार कसे होणार, अशी आगतिकता त्याने व्यक्त केली. बाहेर चौकशी केली तर सरकारी रुग्णालयांमध्ये हे मिळेल असे सांगत बोळवण झाल्याचे त्याने मांडले. वास्तविक म्युकरोमायकोसिस आजार वेगाने वाढत असताना जिल्ह्यात आवश्यक औषधे, इंजेक्शने उपलब्ध झालेली नाही.

एका रुग्णाला कमीत कमी ६० आणि जास्तीतजास्त १०० इंजेक्शने आवश्यक असताना ६० इंजेक्शनचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे औषध विक्रेत्यांकडून याचा काळाबाजार होत असून आगाऊ नोंदणी करत रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरण्याचे काम होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

संयमाची परीक्षा

पुढील दोन ते तीन दिवसांत नाशिक विभागासाठी ३०० इंजेक्शने उपलब्ध होणार आहेत. त्यात नाशिकसाठी ६० इंजेक्शने मिळणार आहेत. हा अपुरा इंजेक्शनचा साठा प्रशासनासह आरोग्य विभागाची संयमाची परीक्षा पाहणारा आहे.

शासनाकडून लवकरच खरेदी

‘म्युकरोमायकोसिस’साठी आवश्यक इंजेक्शन आणि औषधे वरिष्ठ पातळीवर खरेदी करण्यात येत आहे. लवकरच नाशिक विभागाला ही इंजेक्शने उपलब्ध होतील. सद्य:स्थितीत कुठल्याच ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध नाही. याबाबत वेळोवेळी संबंधितांकडे विचारणा होत आहे. – डॉ. अशोक थोरात (जिल्हा शल्यचिकित्सक)