चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शनिवारपासून येथे दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक पातळीवर भाजपमध्ये अनेक गट आहेत. परस्परांवर कुरघोडीचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. या घटनाक्रमाचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून खुद्द पाटील आता विविध घटकांशी चर्चा करून कानोसा घेणार आहेत. त्यामुळे दौऱ्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेटी, संघ परिवारासमवेत बैठक, मंडल अध्यक्ष ते आमदार, अन्य महत्वाच्या पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा, असे भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे याच सुमारास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील दौऱ्यावर येत असून पदाधिकारी बैठकांद्वारे निवडणुकीची व्यूहरचना केली जाणार आहे.

नाशिकची जबाबदारी आधी माजीमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होती. नंतर ती जयकुमार रावल यांच्याकडे सोपविली गेली. मागील निवडणुकीत इतर पक्षांमधून मोठय़ा संख्येने नगरसेवक भाजपमध्ये समाविष्ट झाले होते. तथापि, आता परिस्थिती बदलली आहे. पाच वर्षांत कोणतेही महत्वाचे पद मिळाले नसल्याची सल काहींच्या मनांत आहे. नव्या-जुन्यांचा वादही संपुष्टात आलेला नाही. गटबाजी, संभाव्य पक्षांतर अशा अनेक मुद्यांवर कशाप्रकारे मात करता येईल, यावर या दौऱ्यात मुख्यत्वे मंथन होईल, असे चित्र आहे. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यातील कार्यक्रमाची माहिती भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिली. शनिवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांची संघ समन्वय शाखेतील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. नंतर महानगरातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी महापौरांच्या निवासस्थानी भेट, दुपारी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा, सायंकाळी ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्यांशी बैठक होईल.

मनसेच्याही बैठका

कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आलेल्या नाशिकमध्ये डळमळीत झालेल्या पक्ष संघटनेला उभारी देण्यासाठी मनसेने तयारी सुरू केली आहे. त्या अंतर्गत अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास दोन वर्षांनंतर पक्ष संघटनेच्या कामासाठी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी खासगी दौऱ्यावर ते शहरात आले होते.  शुक्रवारी सायंकाळी राज यांचे शहरात आगमन होणार आहे. शनिवारी दिवसभर ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. निवडक भेटीगाठी घेतील. रविवारी ते मुंबईला रवाना होणार असल्याचे मनसे प्रवक्ता पराग शिंत्रे यांनी सांगितले. मनसेची स्थापना झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदा पक्षाला नाशिकमध्ये लक्षणीय यश मिळाले होते. महापालिका ताब्यात आली. पण, ही सत्ता टिकवता आली नाही. मनसेच्या बहुतांश नगरसेवकांनी भाजपची वाट धरली. पक्षाचे आमदार अन्य पक्षात गेले. पडझड रोखण्याचे प्रयत्न झाले नाहीत. गेल्यावेळी महापालिकेत  पक्षाला केवळ सहा जागांवर विजय मिळाला होता. चांगली कामे करूनही मनसेला यश न मिळाल्याची सल राज यांच्या मनांत कायम राहिली. बहुदा त्यामुळे त्यांचे नाशिककडे दुर्लक्ष झाले. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला होता.