कुटुंबीयांकडे जवान चंदू चव्हाणने मांडली कैफियत

सीमा ओलांडून आपल्या हद्दीत का प्रवेश केला, हे जाणून घेण्यासाठी पाक लष्कराने शारीरिक छळ केला. दोन-तीन दिवस उपाशी ठेवले जायचे. वारंवार विशिष्ट स्वरूपाचे इंजेक्शन देण्यात आले. अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवले. जेव्हा कधी तरी बाहेर काढले जाई, तेव्हा तोंडावर काळे फडके बांधण्यात येत असे. त्यामुळे पाकिस्तानात नेमक्या कोणत्या भागात होतो, कुठे फिरवले याबद्दल आपण स्वत:च अनभिज्ञ आहोत.. हे अनुभव आहेत, चार महिने पाक लष्कराच्या ताब्यात राहिलेल्या चंदू चव्हाणचे.

सुमारे चार महिन्यांच्या कालावधीनंतर पाकच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेला ३७ राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाणची सध्या भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. वरिष्ठांशी झालेल्या मतभेदांतून रागाच्या भरात चंदूने सीमा ओलांडल्याचे सांगितले जाते. त्या अनुषंगाने चाललेल्या चौकशीत दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. मूळचा धुळ्यातील बोरविहीर येथील चंदूच्या सुटकेसाठी या लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळे चव्हाण कुटुंबीयांनी रविवारी सायंकाळी अमृतसर येथील लष्करी छावणीत चंदूची प्रत्यक्ष भेट घेतली. कुटुंबातील सदस्यांना त्याने ओळखले. या वेळी चंदूचा लष्करात असणारा भाऊ भूषण, आजोबा चिंधा पाटील आणि मेव्हणे उपस्थित होते. घरच्यांना पाहताच चंदूच्या अश्रूंचा बांध फुटला. पंधरा ते वीस मिनिटे तो एकसारखा रडत होता. चार महिने विचित्र परिस्थितीत काढल्याने त्याचे मानसिक संतुलन ढासळले होते; परंतु भारतात आल्यानंतर मागील आठ दिवसांत त्याची मानसिक स्थिती सुधारत असल्याचे भूषणने सांगितले. चव्हाण कुटुंबीयांनी लष्करी छावणीत चंदूबरोबर भोजन केले. जवळपास तासाभराच्या भेटीत चंदूने पाकिस्तानातील काही अनुभव कथन केले.

पाक लष्कराच्या ताब्यात सापडल्यापासून त्यांचा प्रयत्न आपण पाकिस्तानी हद्दीत प्रवेश का केला, ही माहिती काढण्याचा राहिला. हाताची बोटे इतक्या वेळा वाकविली की, त्याच्या जखमा आजपर्यंत भरून निघालेल्या नाहीत. ही बोटे वगळता अन्यत्र जखमा झाल्या नाहीत, हेच काय ते सुदैव. उपाशी ठेवून माहिती काढण्याचा पाक लष्कराचा प्रयत्न होता. त्यामुळे दोन-तीन दिवस भोजन दिले जात नव्हते.

यामुळे प्रचंड थकवा यायचा. त्या स्थितीत हातावर वारंवार इंजेक्शन टोचले जात होते. त्यामागील कारण उमगले नाही. पाकिस्तानातील बहुतांश काळ अंधाऱ्या खोलीत काढावा लागला. कधी तरी कोठडीतून बाहेर काढले जात असे; परंतु त्या वेळी चेहरा झाकला जात असल्याने आपण कुठे वास्तव्यास होतो, हेदेखील ज्ञात नसल्याचे चंदूने कुटुंबीयांना सांगितले. या भेटीत चंदूने कुटुंबातील सदस्यांची माहिती जाणून घेतली.

लष्कराकडून चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चंदूला गावी येण्यास परवानगी मिळेल, असे भूषण चव्हाणने सांगितले.