|| अनिकेत साठे

निवृत्तिवेतनासाठी चंदू चव्हाणला लष्करात अधिक सेवा बंधनकारक

पाकिस्तानी लष्कराच्या तावडीत सुमारे चार महिने, भारतात परतल्यावर सलग काही महिने चाललेली चौकशी आणि अखेरीस लष्करी न्यायालयाने दिलेली ८९ दिवसांची शिक्षा.. यामध्ये भारतीय लष्करातील जवान चंदू चव्हाणचा बराच काळ गेला. हा कालावधी लष्करी सेवेत ग्राह्य़ धरला जाणार नाही.

निवृत्तिवेतन मिळण्यासाठी चंदूला नियमित १५ ऐवजी १७ वर्षे सेवा करावी लागणार आहे. म्हणजे सीमेवर तैनात असताना पाकिस्तानच्या हद्दीत शिरण्याची दुहेरी किंमत त्याला मोजावी लागणार आहे.

भारतीय लष्करात कोणताही जवान किमान १५ वर्षे सेवा बजावल्यानंतर निवृत्तिवेतनास पात्र ठरतो. तो पर्याय स्वीकारून त्यांना निवृत्ती स्वीकारता येते. पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप परतलेल्या चंदू चव्हाणला मात्र १७ वर्षे सेवा करावी लागणार असल्याचे लष्कराने सूचित केले आहे. गेल्या वर्षी लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेदी हल्ला चढविला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सीमा ओलांडणारा ३७ राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू पाकिस्तानी लष्कराच्या तावडीत सापडला. चंदू मूळचा धुळे जिल्ह्य़ातील बोरविहीर गावचा. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी त्याच्या सुटकेसाठी बरेच प्रयत्न केले. पाकिस्तानी लष्कराकडून मानसिक, शारीरिक छळवणूक सहन करीत परतलेल्या चंदूमागील शुक्लकाष्ठ अद्याप संपलेले नाही. मुळात, आघाडीवरील आपली चौकी सोडून थेट शत्रू प्रदेशात शिरणे गंभीर बाब ठरते. चौकशीदरम्यान चंदूने भारतीय लष्करी आस्थापनांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन आपण पाकिस्तानविरोधातील संतापातून हे कृत्य केल्याचे सांगितले. पाकिस्तानी सीमा प्रदेशात शिरकाव करताना त्याने चौकीवरील आपल्या सहकाऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कल्पना दिली होती. हे संभाषण मुद्रित करीत स्वत:चा भ्रमणध्वनी भारतीय हद्दीत विशिष्ट जागी ठेवला होता. नंतर तो भ्रमणध्वनी भारतीय लष्कराच्या हाती लागला होता.

सीमावर्ती भागात तैनात एखाद्या युनिटमध्ये असा काही प्रकार घडला तर केवळ संबंधित व्यक्तीच नव्हे, तर तुकडीतील जबाबदार अधिकाऱ्यांवरही वेगवेगळ्या स्वरूपात कारवाई होते. लष्कर संपूर्ण चौकशीअंती कारवाईचे स्वरूप निश्चित करते. दोन वर्षे जादा सेवा हा प्रशासकीय कारवाईचा भाग आहे. – कर्नल आनंद देशपांडे (निवृत्त)

झाले काय?

या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत लष्करी न्यायालयाने चंदूला ८९ दिवसांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर त्याची अहमदनगर येथील लष्करी आस्थापनेत बदली करण्यात आली. या सर्व घडामोडींत गेलेला कालावधी चंदूला जादा सेवेतून भरून काढावा लागणार आहे. नियमानुसार १५ वर्षांतील सेवेनंतर तो निवृत्तिवेतनास पात्र ठरला असता, परंतु लष्कराने निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी त्याला दोन वर्षे अधिक म्हणजे १७ वर्षे सेवा करावी लागणार असल्याची कल्पना दिली आहे.