कोणत्याही गोष्टीचा मोह तसा वाईटच. या मोहापायी स्वत:जवळ जे आहे, तेदेखील गमावण्याची वेळ येऊ शकते. काहीसा तसाच प्रकार पंचवटीतील इंद्रकुंड परिसरात एका नागरिकाबाबत घडला. चोरटय़ांनी एक लाखाची रोकड ठेवण्यास दिल्याचे भासवत त्याच्याकडून साडेपंधरा हजार रुपये काढून घेत पलायन केले. चोरटय़ाने रोकड म्हणून दिलेल्या रुमालात निव्वळ कागद असल्याचे समोर आल्यावर संबंधिताने पोलीस ठाणे गाठले.
अलीकडच्या काळात वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून महिलांकडील दागिने काढून घेण्याचे प्रकार अधूनमधून घडत असतात. फसवणुकीसाठी चोरटय़ांमार्फत लढविल्या जाणाऱ्या जाळ्यात नागरिक अलगदपणे अडकत असल्याचे लक्षात येते. पंचवटीतील इंद्रकुंड येथे गुरुवारी सायंकाळी घडलेला प्रकार त्यापैकीच एक म्हणता येईल. बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर ही घटना घडली. या ठिकाणी तक्रारदार थांबलेले असताना संशयित त्यांच्याजवळ आले. आमच्याकडे एक लाखाची रक्कम असून ही तुमच्याजवळ राहू द्या, अशी विनंती त्यांनी केली. रुमालात बांधलेली वस्तू हाती सोपवताना तुमच्याकडील पैसे आमच्याकडे द्या असेही ते म्हणाले. समोरचा एक लाख रुपये देत असल्याने तक्रारदाराने बहुदा आपल्याकडील रक्कम देण्यास मागेपुढे पाहिले नसेल. भूलथापा देऊन त्यांच्याकडील साडेपंधरा हजार रुपये संशयितांनी काढून घेतले. नंतर काही कारण सांगून ते अंतर्धान पावले.