आजपासून जिल्ह्य़ातील सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणी

विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा तसेच त्यांची आकलन क्षमता स्पष्ट होण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने ‘पायाभूत चाचणी’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून शुक्रवापर्यंत जिल्ह्य़ातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर तसेच त्यांची आकलनक्षमता लक्षात यावी, सर्व विद्यार्थ्यांचा समान विकास व्हावा, यासाठी शिक्षण विभागाने २०१५ पासून पायाभूत चाचणी उपक्रम हाती घेतला आहे. चाचणीत दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची मागील वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेतली जाते.

त्याआधारे विद्यार्थ्यांची आकलनक्षमता समजण्यास मदत होते. पहिले दोन वर्षे हा उपक्रम व्यवस्थित सुरू राहिल्यानंतर अपुऱ्या प्रश्नपत्रिका, नियोजनशून्य कारभार, प्रश्नपत्रिका नवमाध्यमांवर फुटणे असे प्रकार घडल्याने २०१७ मध्ये हा उपक्रम रद्द करण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षांत हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

विद्या प्राधिकरणच्या वतीने सर्व माध्यमांच्या खासगी, सरकारी शाळांमध्ये ही चाचणी होणार आहे. मंगळवारपासून परीक्षांना सुरुवात होणार असून यासाठी दोन दिवस आधी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील वर्षांच्या चुका लक्षात घेता विद्यार्थी संख्येच्या तुलनेत जास्त संच उपलब्ध करून दिल्याचे प्राधिकरणच्या वतीने सांगण्यात आले.

परीक्षा काळात क्षेत्रीय अधिकारी शाळांना भेट देऊन या संदर्भातील अहवाल ऑनलाइन देणार आहे. मंगळवारी इयत्ता दुसरी ते आठवी  प्रथम भाषा, बुधवारी  गणित, गुरुवारी तिसरी ते आठवी इंग्रजी आणि शुक्रवारी सहावी ते आठवी विज्ञान या विषयावर परीक्षा घेतली जाईल.

परीक्षेनंतर आठ ते दहा दिवसांत निकाल तयार करून वरिष्ठ पातळीवर तो अहवाल स्वरूपात सादर केला जाणार आहे. निकालावर विद्यार्थ्यांची आकलनोमता तसेच शाळेची शैक्षणिक गुणवत्ता स्पष्ट होईल. त्यानुसार कृती आराखडय़ात विविध उपक्रमांची आखणी केली जाईल, असे प्राधिकरणचे रवींद्र जाळवे यांनी सांगितले.

विद्या प्राधिकरणकडे आकडेवारीविषयी संदिग्धता

विद्या प्राधिकरण आणि शिक्षण विभाग पायाभूत चाचणीचे नियोजन करत असल्याचा दावा करत आहे, परंतु जिल्ह्य़ातील किती शाळांमध्ये किती विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट आहेत याबाबत विद्या प्राधिकरण तसेच शिक्षण विभागाकडून आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.