नाशिकमध्ये सर्व कसं शांत आहे..कुठे आहेत खून, लुटमार यासारख्या घटना?, अशा घटना फक्त आम्ही सत्तेत होतो, तेव्हांच होत होत्या.आता तिकडे जाऊन सर्व पावन झाले आहेत..शहरात सर्वत्र कामे होत आहेत..नाशिक या आपल्या घरात अडीच वर्षांनंतर ‘चांगलाच’ बदल झाला आहे..

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी येथील भुजबळ फार्म या आपल्या निवासस्थानी शहरातील ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ यांच्या उपहासगर्भ वाणीचा अनुभव पत्रकारांना आला. कधीकाळी आपला मुद्दा आक्रमकपणे मांडणाऱ्या भुजबळ यांच्या स्वभावातील हा बदल चकीत करणारा असाच म्हणावा लागेल. उपहासातून त्यांनी अनेक विषयांसंदर्भात राज्यातील तसेच महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असतांना नाशिकमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवरून तेव्हां भाजपसह मनसे, शिवसेनेने राष्ट्रवादीवर, त्यातही प्रामुख्याने भुजबळांवर गुन्हेगारांना साथ देत असल्याचा आरोप केला होता.  यासंदर्भातील प्रश्नावर भुजबळांनी नाशिक सध्या शांत असल्याची उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. खून, लुटमार यासारख्या घटना आपणास तर कुठेच दिसत नाहीत.

आमच्याकडे होते, तेव्हां ते कार्यकर्ते गुंड आणि तेच त्यांच्याकडे गेल्यावर पावन झाले. त्यामुळे नाशिकमध्ये शांततेचे वातावरण आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून कामे होत आहेत. सारं कसं ‘व्यवस्थित’ सुरू आहे. अडीच वर्षांच्या कालावधीनंतर नाशिकमध्ये परत आल्यावर ‘चांगलाच’ बदल झाला असल्याचे नमूद करतांना शुभ्र दाढीच्या आडून चेहऱ्यावर स्मित उमटलेच.

लोकसभेसह कोणत्याच निवडणुकीतील उमेदवारीविषयी सध्या तरी कोणताच विचार नाही. याविषयी पक्ष काय ठरविणार त्याला महत्व आहे. लोकसभेसाठीची हौस नाशिककरांनी याआधी चांगलीच फेडल्याचेही भुजबळांनी सांगितले.

याशिवाय तुरूंगात भेटावयास येणारी सर्वपक्षीय मंडळी, गंगापूर धरणावरील बोट क्लब, सप्तश्रृंग गडावरील फनिक्युलर ट्रॉलीची सेवा, ओझर विमानतळ, नाशिकच्या हक्काचे पाणी गुजरातला जाऊ न देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धरलेला आग्रह, नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणूक आदी विषयांनाही त्यांनी स्पर्श केला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.