छगन भुजबळ यांचे आवाहन

नाशिक : सर्वानी विचारपूर्वक बोलायला हवे. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावी. मराठा-ओबीसी भांडण आता थांबवायला हवीत. यावर बरीच चर्चा झाली आहे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी के ले आहे.

मराठा आरक्षण आणि राजकीय नेत्यांच्या विधानामुळे चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी भूमिका मांडली. सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत असल्याने दुसरे सुरू करत असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. तलवार कोणावर काढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलवारी नाही, पण शब्दांची खणाखणी झाली आहे. ती थांबायला पाहिजे. यातून राजकारण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा मोर्चाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने एमपीएससीची परीक्षा लांबणीवर टाकली. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याने त्याबाबत जास्त बोलता येणार नाही. पण काहींचे म्हणणे परीक्षा झाली पाहिजे असे आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या परीक्षेबाबतचा पुढील निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी सूचित केले. नाशिकमधील करोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असून मृत्यूदर देखील १.७० टक्के आहे. राज्याच्या दराच्या तुलनेत तो कमी आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात रेमडिसीवरची आठ हजार इंजेक्शन उपलब्ध आहेत. प्राणवायुचाही तुटवडा नाही. प्राणवायुची गरज २४ मेटिक टनची असून साठा ५० मेटिक टन असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.