‘ठाकरे’ चित्रपट पाहण्याचे निमित्त करून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमने उधळत शिवसैनिकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी असल्यास शिवसेना निश्चितच त्यांना पाठिंबा देईल, अशी आशा व्यक्त केली.

बाळासाहेब असते तर अमित शहा पटक देंगे असे बोलू शकले नसते, असे सांगत भाजपला टोलाही हाणला. ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे होत आल्यानंतर रविवारी राष्ट्रवादीकडून विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. भुजबळ यांचे मल्टिप्लेक्सबाहेर आगमन होताच तुतारी वाजवून आणि उपस्थित जुन्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे आणि भुजबळांचा जयघोष केला. चित्रपट पाहून भारावलेल्या भुजबळ यांनी सुमारे ३२ वर्षे शिवसेनेत काम केल्याने चित्रपटात दाखविलेली विविध आंदोलने पाहून स्मृती नव्याने जाग्या झाल्याचे सांगितले. बाळासाहेबांचे कर्तृत्व इतके अफाट आहे की एका चित्रपटात बसणे ते शक्यच नाही. त्यासाठी सात-आठ तरी चित्रपट काढावे लागतील. मध्यंतरीच्या काळात शिवसेना संपली असे म्हटले जाऊ लागले होते; परंतु शिवसेनेची पाळेमुळे इथल्या जमिनीत घट्ट रुतलेली असल्याने शिवसेना संपणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी असल्यास शिवसेना निश्चितच त्यांना पाठिंबा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.