काँग्रेस-राष्ट्रवादी मनोमीलन मेळाव्यात छगन भुजबळ यांचे आवाहन

नाशिक : आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षातील अंतर्गत मतभेद विसरून केवळ पक्षनिष्ठेला महत्त्व देत गल्ली तसेच मुंबईतून लोकशाहीला मारक असलेले ‘ठोकशाही’ सरकार सत्तेतून पायउतार करावे. यासाठी एकदिलाने काम करण्याची गरज असून जात-धर्म याचे राजकारण करू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

शहरातील काँग्रेस कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मनोमीलन बैठक झाली. बैठकीत भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार सुधीर तांबे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी मंत्री शोभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भुजबळ यांनी सरकारच्या एकूणच कार्यशैलीवर ताशेरे ओढले. संविधानाची पायमल्ली करणारे हे सरकार असून लोकशाहीचे खांब खिळखिळे करण्याचे काम यांनी

केले आहे. या विरोधात जो आवाज उठवेल त्याच्या मागे इडी, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशा विविध चौकशांचा ससेमिरा लावून देतात. आम्ही सांगतो तसे वागा अन्यथा..अशी यांची कामाची पद्धत आहे. विरोधी पक्ष यांना नकोच आहे. वास्तविक विरोधी पक्ष आणि सरकार ही लोकशाहीची दोन चाके आहेत हे सरकार विसरले आहे. पक्षातील अंतर्गत वाद, मानपान विसरून एकदिलाने हम सब एक है असे म्हणत काम न केल्यास आगामी निवडणुकांमध्ये बोलण्यासाठी कुठलाच पक्ष राहणार नाही, अशी स्थिती भाजप सरकारने निर्माण केली आहे. या भीतीमुळेच अनेक लोक घाबरून त्यांना मिळाले आहेत. असा हुकूमशाहीचा कारभार पाहिल्यामुळेच आगामी निवडणुका या ‘संविधान विरुद्ध मोदी’ अशा स्वरूपाच्या आहेत. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, जात, धर्म असा कुठलाही भेद न ठेवता निवडणुकांमध्ये एकदिलाने काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. आमदार तांबे यांनी आणीबाणीची वेळ  असल्याचे सांगितले.

‘दोघे घाबरले म्हणून युती’

चौकीदार जर चोर आहे, तर तु का त्याच्या शेजारी बसला ? शिवसेनेचे ‘अगं अगं म्हशी’ असा प्रकार सुरू होता. वास्तविक शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोघेही घाबरले आहेत. त्यांना आपण लोकांपासून खुप दूर गेलो आहोत हे माहीत आहे. निवडणुकांमध्ये आपले काही खरे नाही. दोघेही घाबरले म्हणून त्यांनी युती केली, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

नवखे कोण ?

भाजपकडून प्रियंका गांधी, राहुल गांधी यांची यथेच्छ हेटाळणी केली जाते, पण पुलवामा हल्ला झाला तेव्हां पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी हे प्रचार सभेत गुंतले होते. तेव्हां प्रियंका गांधी यांनी आपली पहिली पत्रकार परिषद रद्द करत राजकीय भाष्य करण्यास नकार दिला. राहुल गांधी यांनी आपत्कालीन परिस्थितीत आम्ही शहीद झालेल्या जवानांचे कुटूंब तसेच सरकारसोबत आहोत, असे सांगत सरकारला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे राजकारणात नवखे कोण, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.