राष्ट्रवादी आणि समता परिषदेत स्वागतासाठी चढाओढ

बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर सुमारे अडीच वर्षांनंतर गुरुवारी नाशिकला प्रथमच दाखल झालेले माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ या काका-पुतण्यांचे जल्लोषात स्वागत करताना राष्ट्रवादी आणि समता परिषद यांच्यात एकच चढाओढ झाल्याचे दिसून आले. जणू काही त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडीची स्पर्धा सुरू असल्याची पाहावयास मिळाली. पूर्वाश्रमीचे सहकारी आणि सध्या शिवसेनेसह इतर पक्षात दाखल झालेल्यांनीही महामार्गावर भलेमोठे फलक उभारत भुजबळांचे स्वागत केले.

सक्तवसुली संचालनालयाने प्रथम माजी खासदार समीर भुजबळ आणि नंतर आ. छगन भुजबळ यांना अटक केली होती. या कारवाईमुळे भुजबळ काका-पुतणे सुमारे दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात होते. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने उभयतांना जामीन मंजूर केला. मुंबई येथे उपचार घेऊन प्रथम पुण्यात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात हजेरी लावल्यानंतर छगन भुजबळ यांनी आपला मोर्चा नाशिककडे वळवला. जवळपास अडीच वर्षांनंतर भुजबळ येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेतर्फे स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. या नियोजनासाठी पक्ष आणि समता परिषद यांच्या स्वतंत्रपणे झालेल्या बैठकीने उभयंतामधील अंतर अधोरेखित केले.

राष्ट्रवादी भवन येथे नवचैतन्याची गुढी उभारली गेली. महामार्गावर स्वागताचे फलक उभारले गेले. गुरुवारी दुपारी भुजबळ यांचे इगतपुरी, वाडिवऱ्हे, पाथर्डी फाटा आदी ठिकाणी फटाके फोडून आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पाथर्डी फाटा येथे स्वागतासाठी पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने जमले होते.

भुजबळांचे आगमन झाल्यावर घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. या चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आणि जमलेल्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानून मोटारीतून पुढे मार्गस्थ झाले.

गणेशवाडी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आणि शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. नंतर भुजबळ यांचा ताफा राष्ट्रवादी भवनमध्ये पोहोचला. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक, संतोष सोनपसारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्वागतासाठी जुने सहकारीही सरसावले

भुजबळ यांच्या सुटकेसाठी मागील दोन वर्षांपासून समता परिषद भुजबळ समर्थक या नावाखाली धडपड करीत होती. त्या वेळी पक्षातील भुजबळांचे निकटवर्तीय वगळता काही घटकांचे सहकार्य मिळाले तर काही घटकांचे मिळाले नसल्याची समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची सल आहे. यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये भुजबळांच्या स्वागतावेळी अप्रत्यक्षपणे अशी विभागणी झाली होती. भुजबळांचे स्वागत करण्यास त्यांचे जुने सहकारीदेखील धावून आले. शिवसेनावासी झालेले शिवाजी चुंबळे यांनी महामार्गावर भव्यदिव्य फलक उभारून ‘वेलकम बॉस बॅक’ अशा आशयाचे फलक उभारले होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील दांडगा उत्साह पाहून भुजबळही चकीत झाले.

रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार

आपल्या कार्यकाळात जवळपास हाती घेण्यात आलेले, परंतु सत्तांतरानंतर कार्यान्वित न झालेले गंगापूर धरणातील बोट क्लब, बचत गटातील महिलांसाठीचे कलाग्राम आणि सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉली यांसारखे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादी भवन येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी जोमाने प्रयत्न केले जातील. आपल्या प्रयत्नातून पूर्णत्वास आलेल्या ओझर विमानतळावरून शुक्रवारी नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत असल्याचा आपणास आनंद होत असल्याचे ते म्हणाले. सहादिवसीय दौऱ्यात भुजबळ हे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. जिल्ह्य़ातील आणि मतदारसंघातील कामांचा आढावा ते या वेळी घेतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.