आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पक्षांतराचे जोरदार वारे वाहत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेदेखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत आहेत. सेना प्रवेशाच्या चर्चामध्ये तथ्य नसल्याचा दावा माजी खासदार समीर भुजबळ यांनी केला. दुसरीकडे भुजबळ यांच्या प्रवेशाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत योग्य वेळी, योग्य उत्तर असे रहस्य वाढविणारे उत्तर दिल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. भुजबळांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवरून विरोध सुरू झाला आहे.

काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते सत्ताधारी भाजप-सेनेत दाखल होत आहे. इगतपुरी मतदारसंघाच्या नुकताच आमदारकीचा राजीनामा दिलेल्या निर्मला गावित यांनी सेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हेदेखील पुन्हा स्वगृही अर्थात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची वदंता आहे. त्यात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संभ्रमात अधिक भर पडली. पक्षप्रमुखांनी भुजबळांना सेनेत प्रवेश मिळणार की नाही हे स्पष्ट सांगणे टाळले. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे बळ वाढविण्यासाठी ऐनवेळी त्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन भुजबळांशी आजवर लढा देणाऱ्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला जेव्हा गरज होती, तेव्हा भुजबळांनी सेनेला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना आज मजबूत असून भुजबळांची सेनेला गरज नसल्याचा सूर स्थानिक पातळीवर उमटत आहे.

भुजबळांच्या सेना प्रवेशास विरोध करणारे काही फलकही शहरात झळकले. येवला मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या भुजबळांना सेनेत प्रवेशाला अनेक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्या अनुषंगाने पक्षात महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या नेत्यांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. भुजबळ शिवसेनेत येणार याचे कोणीही स्वागत केले नाही. उलट शिवसैनिक विरोध करून त्यांची भावना व्यक्त करत असल्याचे सेनेच्या जिल्हा, शहरात जबाबदारी स्वीकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भुजबळांविरोधात तीव्र भावना व्यक्त होत असली तरी शिवसेनेत कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला नाकारायचा याचे सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुखांना असल्याचे उभयतांनी म्हटले आहे. भुजबळांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये, अशी भावना शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. येवला मतदारसंघात शिवसेनेने मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत येवला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारास मताधिक्य मिळाले नव्हते. यामुळे ते सेनेत प्रवेश करण्याची धास्ती शिवसैनिकांना आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी छगन भुजबळ यांच्या सेना प्रवेशाच्या चर्चामध्ये तथ्य नसल्याचा दावा केला.