जवळपास दोन वर्षांपासून कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि कुटूंबावर अन्याय झाल्याचा दावा करत या निषेधार्थ मंगळवारी भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलकांनी यावेळी काळे वस्त्र परिधान करत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदारांना दिले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपांखाली चौकशी यंत्रणांनी गेल्या २२ महिन्यांपासून चौकशीच्या नावाखाली डांबून ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जामीन न देणारा कायदा घटनाबाह्य़ असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नुकताच न्यायनिवाडा दिला आहे. केवळ आकसापोटी गुन्हा सिध्द झाला नसतांना त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप समर्थकांनी केला. राजकीय कट करत भुजबळ यांचे चरित्रहनन करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. पूर्वनियोजित पटकथेनुसार तपास यंत्रणा काम करत आहे. भुजबळ परिवाराकडून चौकशीला संपूर्ण सहकार्य होत असताना समीर भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीच्या नावाखाली बोलावून अटक केली. महाराष्ट्र सदनाबाबत भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना ती वास्तू आजही दिल्लीत दिमाखात उभी आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. भुजबळांना अटक आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणे हे त्यांच्या राजकीय खच्चीकरणाचा प्रयत्न आहे. या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू राहणार असल्याचे समर्थकांनी सांगितले. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक काही काळ खोळंबली. जिल्ह्य़ात छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यासह ठिकठिकाणी तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन झाले. शहरात झालेल्या आंदोलनात आ. जयंत जाधव, माजी खासदार देवीदास पिंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नगरसेवक गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक आदी उपस्थित होते.

घोषणा अन् फलकबाजी

भुजबळांवरील अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी समर्थकांनी काळे पोशाख तसेच डोक्यावर ‘मी भुजबळ’ या नावाच्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या. समर्थकांनी यावेळी ‘भुजबळसाहेब मांगे जस्टीस, साहेब संघर्ष करो. हम तुम्हारे साथ है.’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलकांनी वेगवेगळ्या मागण्यांचे फलक झळकावले. खूप झालं, खूप सोसलं, तयारी आता सत्याग्रहाची. साहेबांवरील अन्यायाविरुद्ध, वेळ आली आता लढण्याची.. भावना सूडबुद्धीची, लाचार राजकारणाची.. आदींचा त्यात समावेश होता.