विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. सकाळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र ११५ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा होणार आहे. नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित प्रकल्प योजनांचा आढावा, कायदा-सुव्यवस्थेचा आढावाही बैठकांमधून घेतला जाणार आहे.
दीक्षांत सोहळ्याचा कार्यक्रम महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, गृहनिर्माण आणि पोलीस कल्याण महामंडळाचे महासंचालक बिपीन बिहारी, अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना उपस्थित राहणार आहेत. प्रशिक्षणार्थीच्या तुकडीत ८१९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमानंतर सकाळी दहा वाजता नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका होणार आहेत. त्यात प्रथम जिल्ह्य़ातील प्रलंबित महत्वाच्या योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. दुपारी कायदा-सुव्यवस्थेची आढावा बैठक होईल.
First Published on October 5, 2018 4:13 am