भाजपच्या गटातटांना पारदर्शक कारभार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महापालिका परिवहन समितीचा विषय नियमात बसणारा असेल तर सभागृहाने तो निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या गटातटांना या विषयात नाहक ढवळाढवळ करू नका, अशा कानपिचक्या देत पारदर्शकपणे कारभार करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेची शहर बस सेवा आणि मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष नियोजनबद्ध  शहर वसविण्याच्या प्रस्तावावर बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. यावरून आदल्या दिवशी पक्षांतर्गत वाद विकोपाला गेल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

शिष्टमंडळात शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, स्थायी सभापती हिमगौरी आहेर यांच्यासह नगरसेवकही उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाची थेट मुख्यमंत्र्यांशी भेट घडवली. बस सेवेत परिवहन समितीची गरज नसल्याची भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. परिवहन समिती अस्तित्वात असणाऱ्या महापालिकांची बस सेवा तोटय़ात जाते. कारण राजकीय मंडळींचा हस्तक्षेप होतो. बस सेवा सुरळीतपणे चालविण्यात अडचणींना तोंड द्यावे लागते, असे मुद्दे त्यांनी यावेळी मांडले. सानप, महापौर भानसी यांनी बस सेवा सुरू करताना परिवहन समितीची आवश्यकता मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

शिष्टमंडळाचे म्हणणे जाणून घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी परिवहन समिती महापालिकेच्या नियमात बसणारी असेल तर त्याबाबतचा निर्णय सभागृहाने घ्यावा, परंतु, ढवढाढवळ न करता पारदर्शकपणे कारभार करण्याचे सूचित केले. या निर्देशांमुळे परिवहन समिती अस्तित्वात येईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. परिवहन समिती स्थापन झाल्यास तिला अधिकार मिळणे क्रमप्राप्त आहे. समिती स्थापन करून तिला अधिकार न देणे अशक्य आहे. यामुळे ही समिती अस्तित्वात येईल की नाही, याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिक शेतकरी विरोध करत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून दिली. मखमलाबाद शिवारातील विशेष नियोजनबद्ध  नगर वसविण्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्याने तो रद्द करण्याची नगरसेवकांची भावना असल्याचे सांगण्यात आले.

मखमलाबाद येथील स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबतही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यास सांगितले आहे. उपरोक्त प्रकल्पाची माहिती शेतकऱ्यांना द्यावी, कोणी नाराज होणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याने भेटीसाठी गेलेले काही पदाधिकारी निरुत्तर झाल्याचे सांगितले जाते. या दोन्ही विषयांवर बुधवारी सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

परिवहन समिती स्थापनेचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्र्यांनी महापालिका शहर बस सेवेसाठी परिवहन समिती स्थापन करण्यासंदर्भात जे नियमात बसणारे आहे, त्यासंबंधीचा निर्णय सर्वसाधारण सभेने घ्यावा असे सूचित केले आहे. यामुळे शहर बस सेवेसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत विशेष नियोजनबद्ध शहर वसविण्याच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले आहे. शेतकरी नाराज होणार नाही याची दक्षता घेऊन या प्रकल्पाविषयी त्यांना माहिती द्यावी, असे सूचित केले आहे.

– आ. बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप