श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित

नवजात बालकांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणे समोर येत असली तरी प्रत्यक्षात याच्या मुळाशी भूक हेच एकमेव कारण आहे, असे श्रमजीवी संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयास आ. पंडित यांनी भेट देऊन बालमृत्यूची सविस्तर माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. आदिवासी भागातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही तजवीज झालेली नाही. यामुळे देशाला स्वातंत्र मिळून ७० वर्षे उलटल्यानंतरही भुकेने नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याचा ठपका पंडित यांनी ठेवला.  काही वर्षांपूर्वी पालघर व मोखाडा भागात ६०० बालकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रत्येक आदिवासी कुटुंबाला शासनाने ३५ किलो धान्य पुरवठा करावा असा प्रस्ताव आम्ही दिला. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सूचित केले.

पोषक अन्नधान्याअभावी आदिवासींची हेळसांड होत आहे. २५ ते ३० किलो वजन असणाऱ्या आदिवासी महिला एक किलोहून अधिक वजनाच्या बाळाला जन्म देऊ शकत नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यावर पंडित यांनी या समस्येचे मूळ आहारात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणणे ही तुमची जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली.

जिल्ह्यात पाच महिन्यात ज्या नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यातील ७२ टक्के बालके ही आदिवासी भागातील होती. बालमृत्यू ही वैद्यकीय समस्या नाही तर सामाजिक समस्या आहे. त्याचे मूळ प्रथिनयुक्त आहार न मिळण्यात आहे. त्यास आरोग्य मंत्र्यांसह शासन जबाबदार आहे. महापालिका रुग्णालयाच्या कारभारावरही त्यांनी ताशेरे ओढले. पालिकेच्या रुग्णालयात १७ इनक्युबेटर असूनही ते नादुरुस्त वा बंद आहे. शहरातील बालकांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. या यंत्रणेवर ताण वाढतो. या घडामोडींकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी केला. आदिवासी कुटुंबीयांना अन्नधान्य गरजेचे आहे. तो प्रश्न सुटल्याशिवाय रुग्णालयांमध्ये कितीही व्यवस्था केली तरी त्याचा उपयोग होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.