पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरमध्ये खास उपक्रम

जिल्ह्य़ातील माता-बालमृत्यूचे प्रमाण पाहता ते रोखण्यासाठी आरोग्य विभाग विशेष पथदर्शी प्रकल्प राबविणार आहे. अतिसंवेदनशील असलेल्या पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबक या तीन तालुक्यांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भात मुलांना घरबसल्या किमान प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी आशा, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे.

आदिवासी तसेच दुर्गम पाडय़ावर आरोग्य सुविधा न पोहचल्याने त्या भागात बालमृत्यूचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास आदिवासीबहुल त्र्यंबक, पेठ व सुरगाणा तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. त्र्यंबक येथे २४, पेठ येथे २२ तसेच सुरगाणा येथेही २२ बालकांचा मृत्यू झाला आहे. शून्य ते सहा वयोगटातील ही बालके असून याआरोग्य केंद्र घरापासून दूर असल्याने बालकाला दवाखान्यात ने-आण करण्यात पालकांकडून दिरंगाई होते. मागील कारणांचा अभ्यास केला तर ताप, अतिसार, उलटी, न्युमोनिया, कुपोषण आदी कारणे प्रथमदर्शनी समोर आली. आरोग्य केंद्र घरापासून दूर असल्याने बालकाला दवाखान्यात ने-आण करण्यात पालकांकडून दिरंगाई होते. काही ठिकाणी अंधश्रद्धेपोटीही बालकांना दवाखान्यात नेले जात नाही. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग आता १०८ रुग्णवाहिका तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आशा यांच्या माध्यमातून या विशेष बालकांवर लक्ष केंद्रित करत आहे. याबाबत संबंधितांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत होत असून यामध्ये किमान सातत्य बाळगण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

घरबसल्या प्राथमिक उपचार

बालमृत्यू रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पात बालकांना घरबसल्या किमान प्राथमिक उपचार कसे करता येतील, याबद्दल आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहेत. प्रशिक्षणानंतर दुसऱ्या टप्प्यात आता आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक हे संबंधित गावात तसेच पाडय़ावर जाऊन जोखीमग्रस्त बालकांचा शोध घेत आहे. अशा बालकांची माहिती घेताना प्रामुख्याने जन्मत: कमी वजन असलेली बालके, जंतुसंसर्गाने आजारी बालके, निमोनिया, अतिसाराने त्रस्त बालके यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. कमी वजनाच्या बाळासाठी आईची ऊब तसेच ऊबदार गोधडीच्या मदतीने बाळाचे वजन कसे वाढवता येईल, याचे प्रात्यक्षिक दिले जाते. अन्य आजारांसाठी किमान प्राथमिक उपचारासाठी आवश्यक औषधे ही बालकांना देण्यात येत आहे. उपचारांची निकड असलेल्यांना तातडीने जवळच्या प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालयाकडे पाठविले जाते.

अतिसंवदेनशील भागांवर लक्ष

त्र्यंबक, पेठ आणि सुरगाणा येथे सरासरी ६० हून अधिक बालके वेगवेगळ्या कारणांनी दगावली आहेत. उपचाराअभावी ही बालके दगावली असून या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या भागातील विशेष बालकांना आरोग्य विभाग घरबसल्या सेवा देत आहे. यासाठी आशा व आरोग्य सेवकांकडे किमान प्राथमिक उपचारासाठी झिंकच्या गोळ्या, ओआरएच पावडर, तापावर पॅरासिटामोल सिरप, अ‍ॅमोसिली सिरप, सेप्रॉन ही औषधे देण्यात आली आहे.

डॉ. योगेश मोरे (त्र्यंबक तालुका वैद्यकीय अधिकारी)