‘मातृत्व’ हे सृजनशीलतेला पडलेलं सुंदर स्वप्न.. हा आनंद आजही ज्यांच्या वाटेला येत नाही, अशा कुटूंबियांना किंवा त्या महिलेला पुरोगामी बिरूद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. अशा रित्या ओंजळीत अनाथ बालकांच्या माध्यमातून आनंदाचे दान दिले जाते. मात्र आजही आश्रमांमध्ये विशेष काळजी आवश्यक असणारी अनेक चिमुकले पाल्यांच्या प्रतिक्षेत आहेत. परदेशी दाम्पत्यांनी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला असून नाशिकमधून मागील दोन वर्षांत सात विशेष वंचित बालके परदेशातील हक्काच्या घरटय़ात विसावली आहेत. तुलनेत भारतातील पालकांकडून या बालकांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांत आपल्याकडे दत्तक विधानाचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. मात्र, त्यातही भारतातील पालक हा चोखंदळ असतो. बाजारातील एखादे उत्पादन आपण खरेदी करत आहोत, अशा अविर्भावात ते दत्तक जाणाऱ्या बाळाची शहानिशा करतात. त्यातही अनेकांची मुलगाच हवा, गोरा हवा अशी मानसिकता असते. या गदारोळात विशेष काळजी आवश्यक असणारी बालके सुरक्षित पालकत्वापासून वंचित राहतात. यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाची ‘कारा’ संस्था प्रयत्न करत असल्याने जागतिक स्तरावर अशा वंचित बालकांसाठी प्रयत्नशील असलेल्या संस्थांनी विकसित केलेल्या ‘केअरिंग’ तंत्रप्रणालीतून वंचित बालके परदेशी दत्तक जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
केअरिंगच्या माध्यमातून विशेष वंचित बालकांची संपूर्ण माहिती, त्याला असलेला आजार, त्यांच्यावर सुरू असणारे उपचार, एखादे व्यंग याचा तपशील उपलब्ध असतो. विविध संस्था ही माहिती त्या संकेतस्थळावर देत राहतात. एखादे दाम्पत्य किंवा एकल पालक बाळ स्विकारण्यास तयार असेल तर बाळ दत्तक घेणाऱ्या कुटुंबियांची क्षमता संस्थेमार्फत तपासली जाते. ते करताना पालक आणि बाळ यांच्यात संवाद व्हावा, यासाठी व्हीडिओ कॉन्फरन्स किंवा छायाचित्रांच्या माध्यमातून परस्परांची ओळख करून दिली जाते. प्रत्यक्ष कायदेशीर पध्दतीने ही प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचे पालन पोषण योग्य पध्दतीने होत आहे किंवा नाही, यावर लक्ष ठेवले जाते. त्यात काही त्रुटी आढळल्यास कायदेशीर मार्गाने पालकांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. अनाथाश्रमांच्यावतीने दत्तक विधान किंवा विशेष काळजी आवश्यक बालकांना सुरक्षित पालकत्वासाठी पालकांचे समुपदेशन होत आहे. या बालकांना दत्तक घेण्याची परदेशी पालकांची मानसिकता होत असतांना भारतात मात्र कमालीची अनास्था आहे.
या विषयी आधाराश्रमाचे समन्वयक राहुल जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत आश्रमातून विशेष काळजी आवश्यक असणारी पाच बालके परदेशी पालकांनी दत्तक घेतली तर दोन बालकांसाठी दत्तक प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद केले. त्यात शारिरीक व्यंग असलेले आदित्य, समर्थ, परी, नयना, सखी यांना इटलीसह अन्य देशात हक्काचे आई-बाबा व घर मिळाले. आता पावणे दोन वर्षांचा शिव आणि पारस इटलीला जाणार आहेत.
शिवला जन्मत थॅलेसिमीया असून पारसला एका कानाने ऐकू येत नाही. मात्र, संबंधितांच्या पालकांनी त्यांना व्यंगासह स्विकारले आहे. परदेशी पालक या बालकांना दत्तक घेण्यास पुढाकार घेत असताना देशातील पालकात हे प्रमाण केवळ १०० मागे एक असे आहे. भारतीय पालकांनी अशा बालकांचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले.