|| चारुशीला कुलकर्णी

नैराश्याचे प्रमाण वाढले, सुटका करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत :- बदलती जीवनशैली, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, विभक्त होत जाणारे कुटुंब या विळख्यात बालविश्व गुरफटत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी बालके आता व्यसनांचा आधार घेऊ लागली आहेत. व्यसनांमुळे त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण वाढले असून हा वयोगट अवघ्या पाच ते १० वर्षांपर्यंतचा असल्याचे धक्कादायक चित्र जिल्ह्य़ात पाहायला मिळत आहे. काही पालक बालकांच्या मानसिक आरोग्याविषयी सजग असल्याने संबंधितांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली, तर काही आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण वेळ देत या विळख्यातून त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

काही वर्षांपासून कुटुंब लहान झाले आणि वाढत्या वयातल्या बाळाला आई-वडिलांचा वेळ जास्त मिळू लागला. पण याच वेळी आई-वडिलांना मोहविणाऱ्या अनेक गोष्टी दिसू लागल्या. यामध्ये भ्रमणध्वनी, टीव्ही, समाजमाध्यमांचा फास पडण्यास सुरुवात झाली. पालक आभासी विश्वात रममाण होत असताना तीच सवय लहानग्यांना लागली. दोन वर्षांच्या चिमुकल्यांपासून किशोरवयीन बालकांपर्यंत मुले या आभासी विश्वातच रमू लागली. परिणामी मैदानावरील खेळ, चारचौघांमध्ये खेळणे, एकमेकांसोबत असणारे वाद, पुन्हा एकत्र येणे मुले विसरली.

लहान मुलांना भ्रमणध्वनीची प्रचंड आवड असून त्यामुळे ते आभासी जगात रममाण होत आहेत. कॅन्डी क्रश, टेंपल रन किंवा पब्जीसारखे गेम खेळताना त्यांच्या हे लक्षात येत नाही. आपण हा खेळ प्रत्यक्ष खेळत नसून केवळ हे काल्पनिक आहे. परंतु त्या वेळी मेंदूत खेळ खेळताना उत्साह, ऊर्जा तयार होते. त्याचा वापर योग्य पद्धतीने होत नाही. परिणामी मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव, चिडचिड वाढत आहे. दोन ते तीन वर्षांत पाच ते १० वयोगटातील बालकांमध्ये चिडचिड मोठय़ा प्रमाणावर वाढली असून यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी व्यसनांना जवळ केले आहे. लहान मुलांमध्ये भ्रमणध्वनी, तंबाखू, गुटखा, बिडी, व्हाइटनरसोबतच पेट्रोल कपडय़ावर टाकत त्याचा वास घेण्याचे विचित्र व्यसन लागले आहे. याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावर होत आहे. मुलांमध्ये संयम वाढवून त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. अपयश कसे पचवायचे याची माहिती मुलांना द्यायला हवी, असे जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांनी सांगितले.

लहान मुलांवर प्रचंड दबाव असून त्यांनी अभ्यासात हुशार व्हावे, त्यांना वेगवेगळी कौशल्ये आत्मसात असावीत, या पालकांच्या अपेक्षांचे ओझे मुलांवर असते. यातून बाहेर पडण्यासाठी ते भ्रमणध्वनी, टीव्हीला जवळ करतात. दुर्दैवाने पालकांकडेही त्यांना द्यायला वेळ नाही. यातून काही मुले आत्महत्येचा पर्याय निवडतात, याकडे डॉॅ. हेमंत सोननीस यांनी लक्ष वेधले.

पालकांची जबाबदारी

मुलांमध्ये होणारी चिडचिड समजून घेत त्यांच्यातील वैचारिक प्रगल्भता लक्षात घ्यायला हवी. मुलांना भ्रमणध्वनी किंवा टीव्हीपासून दूर ठेवत बरोबरच्या मुलांसोबत खेळायला पाठवा. अभ्यास- गुण- परीक्षा याविषयी दबाव आणण्यापेक्षा त्यांचे निसर्गकौशल्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न करा. काम करताना मुलांना सोबत घ्या. मूल जेव्हा आपल्याशी बोलते, तेव्हा लक्षपूर्वक ऐकत त्याचे उत्तर द्या. मुलांमध्ये रंगरूपाचा गंड निर्माण होऊ देऊ नका.  ती कुटुंबाशी जोडलेली राहतात. त्यांना इतरांशी संवाद साधतांना अडचण येत नाही. सहज मैत्री होते. परीक्षेत चांगले गुण मिळविले म्हणजे तो छान असे नाही. तर तो समाजात माणूस म्हणून कसा वावरतो, मोठय़ांचा आदर कसा करतो याविषयीही त्याचे कौतुक करा.