नटसम्राट नाटकात कावेरी यांच्या तोंडी एक संवाद आहे ‘आपण नेहमी समोरच्याला जेवणाचे ताट द्यावे, बसण्याचा पाट देऊ नये’ कारण.. याची प्रचिती मनमाड येथील वृध्द आहेर दाम्पत्य घेत आहे. मुलांनी त्यांची जमीन जबरदस्तीने बळकावल्यानंतर त्याविषयी काही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी संबंधितांनी दिली आहे. याबाबत प्रशासनाचा दरवाजा ठोकावूनही न्याय न मिळाल्याने दोघांनी जीवाचे बरे वाईट करण्याचा इशारा दिला आहे.
मनमाड येथे हिसवळ गावात परशराम आहेर व त्यांची पत्नी आसराबाई दोन मुलांसह राहतात. आहेर दाम्पत्य वडिलोपार्जित शेती व्यवसाय करून आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना भास्कर, सुखदेव ही दोन मुले आणि मंगलाबाई ही मुलगी आहे. भास्कर शेती तर सुखदेव हा वीज वितरण कंपनीत कामास आहे. काही वर्षांपूर्वी दोघा मुलांनी आई-वडिलांच्या भोळसटपणाचा फायदा घेत वडिलोपार्जित शेती स्वतच्या नावावर हिस्सेवाटप करून पोटखराबा आईच्या नावाने ठेवला. मात्र काही दिवसांनी गावातील राजकीय पुढारी व मित्रांच्या मदतीने आई-वडिलांवर दबाव टाकून त्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा केला. त्यावेळी भास्करने वार्षिक ३० हजार रुपये व चार पोते धान्य देऊ असे सांगितले. मात्र त्यातील पैसे आणि धान्य काहीही न मिळाल्याने या दाम्पत्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उलट पैसे, धान्य किंवा जमिनीचा हक्क मागितल्यास जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे आम्हीच गळफास घेऊन आमची जीवनयात्रा संपवून या त्रासातून मुक्त होवू, त्यानंतर होणाऱ्या परिणामास दोघे मुले व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा परशराम आहेर यांनी पत्रकाद्वारे दिला. तर आसराबाई यांनी आमच्या दोन्ही मुलांनी आम्हाला घराबाहेर काढले, आमच्या संपत्तीवर कब्जा केला. मात्र आम्ही जिवंत असो वा नसो. आमची संपत्ती मुलीच्या नावे व्हावी ही आमची इच्छा असल्याचे म्हटले आहे.