News Flash

लहान मुलांना वाहतूक नियमांचे धडे देणारे उद्यान

रस्ता वाहतुकीत लाल रंग, दिवा आणि वस्तुचा अर्थ काय ? पदपथ नसल्यास पादचाऱ्यांनी रस्त्याच्या कोणत्या बाजुने चालावे ?

‘चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क’चे उद्या उद्घाटन

रस्ता वाहतुकीत लाल रंग, दिवा आणि वस्तुचा अर्थ काय ? पदपथ नसल्यास पादचाऱ्यांनी रस्त्याच्या कोणत्या बाजुने चालावे ? रस्ता वाहतुकीची चिन्हे किती प्रकारची आहेत.? नाशिक फर्स्ट या संस्थेने साकारलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कमध्ये अनोख्या पध्दतीने मोटार वाहतुकीचे नियम विद्यार्थ्यांंना वेगवेगळ्या प्रश्नावलीच्या माध्यमातून अवगत करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी या उद्यानात रस्त्यांवर असणाऱ्या वास्तव स्थितीचे प्रतिरूप साकारण्यात आले आहे. या व्यतिरिक्त शालेय विद्यार्थी रस्ता सुरक्षा रहदारी नियम प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या वाहतूक प्रशिक्षण केंद्रामार्फत रिक्षाचालक व इतर वाहनधारकांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे. या उद्यानाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता महिंद्रा अँड महिंद्राच्या मनुष्यबळ विकास विभागाचे अध्यक्ष राजीव दुबे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मुंबई नाका परिसरातील मोटकरीनगर येथील तीन एकर जागेत वाहतुकीच्या नियमांची माहिती देणारे हे उद्यान साकारण्यात आले आहे. नाशिक फर्स्ट संस्थेतर्फे त्याकरिता मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. उद्घाटन सोहळ्यास माजी पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरीचा, लॉर्ड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विलास ढवळे, महापौर अशोक मुर्तडक, पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित राहणार आहेत. या उद्यानाला भेट देऊन प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी नंतर पालकांना देखील वाहतुकीच्या नियमांची आठवण करून देईल, अशी एकंतर त्याची रचना असल्याचे लक्षात येते. या प्रकल्पास जवळपास साडे तीन कोटी रुपये खर्च आला. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी अडीच कोटी तर लॉर्ड इंडियाने ६० लाखाचा निधी दिला आहे. संस्थेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
उद्यानात भ्रमंती करताना कोणत्याही रस्त्यांवर असणारी सर्वागिण स्थिती अनुभवयास मिळते. म्हणजे, उड्डाण पूल, ‘झेब्रा क्रॉसिंग’, सिग्नल यंत्रणा, एकेरी मार्ग, पदपथ, बस थांबा, रुग्णालय, पेट्रोल पंप, रस्ता वाहतुकीचे दिशादर्शक फलक, आदेशात्मक चिन्हे, सावध करणारी चिन्हे कोणती आदी वाहतूक नियमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘अ‍ॅम्पी थिएटर’ची उभारणी करण्यात आली आहे. वाहतूक प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्याच्या उपक्रमास सुरूवातही झाली आहे. दररोज ४० विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यांच्यासाठी २० सायकल्सची सोय आहे. उद्यानातील सर्व रस्त्यांवर फेरफटका मारून वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील स्थिती याचे ते अवलोकन करतात. यावेळी वाहतूक पोलीसही उपस्थित असतात. नंतर डॉ. मधुकर शेंबडे यांनी निर्मिलेल्या खास अभ्यासक्रमाचे पाठ दिले जातात. प्रथम विद्यार्थ्यांची प्रशिक्षण पूर्व आणि नंतर प्रशिक्षणानंतर चाचणी घेतली जाते. सायंकाळी याच ठिकाणी रिक्षाचालक व इतर वाहनधारकांना मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. हा उपक्रम चालविण्यासाठी दरमहा दोन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे संस्थेने दोन कोटीचा ‘कॉर्पस फंड’ जमा करण्याचे ठरवले असून उद्यानातील एक एक विभागाचे प्रायोजकत्व इच्छुकांना दिले जाणार आहे.महापालिकेची न्यारी तऱ्हा..
अनेक सामाजिक व राजकीय नेत्यांशी संबंधित संस्थांना नाममात्र दरात भूखंड उपलब्ध करणारी महापालिका ‘चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क’च्या जागेसाठी महिन्याकाठी १३ हजार ५०० रुपये भाडे आकारत आहे. वास्तविक हा उपक्रम नव्या पिढीला वाहतूक नियमांचे भान आणून देणारा आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तो मोफत स्वरुपात राबविला जाणार आहे. असे असताना पालिकेच्या भाडे आकारणीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 7:01 am

Web Title: childrens traffic education park inaugurated tomorrow
Next Stories
1 ‘गणपती गेम’मध्ये बच्चे कंपनी मग्न
2 श्रेयाच्या चढाओढीत पोलिसांकडे दुर्लक्ष
3 तिसऱ्या पर्वणीसाठी त्र्यंबक नगरी सज्ज
Just Now!
X