सत्कार समारंभात रोईंगपटू दत्तू भोकनळ याचे मत

प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीनुसार आत्मपरीक्षण करून योग्य खेळाची निवड केल्यास आपल्याला त्यात नक्कीच यश मिळते. त्यातून आपले आणि आपल्या देशाचे भवितव्य आपण उज्वल करू शकतो, असे मत आशियाई क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदक विजेते रोईंगपटू दत्तू भोकनळ याने व्यक्त केले.

येथील मानवधन सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय, ओ.एन.आर.सी. यांच्या वतीने भोकनळ यांचा मानवधन गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाजत गाजत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळातील विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर उलगडले. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयनच्या (रोईंग) सांघिक गटात  देशाला सुवर्ण पदक मिळवून दिल्याने दत्तू भोकनळ या चांदवड तालुक्यातील छोटय़ा गावातील भूमिपुत्राने नाशिक जिल्ह्य़ासह देशाची मान अभिमानाने उंचावली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व्यक्तिमत्व विकसित करून देशास समृद्धी प्रदान करावी यासाठी आदर्शवत अनुकरणीय व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसमोर आणण्याच्या दृष्टिने भोकनळ याची भेट घडवून आणल्याचे नमूद केले.

यावेळी संस्थेच्या सचिव ज्योती कोल्हे, ओ.एन.आर.सी.चे पंकज काळे, नितीन काळे, अमोल भोकनळ, रवि भोकनळ आदी उपस्थित होते.