नाशिकसह परिसरात नाताळला अभूतपूर्व उत्साहात सुरुवात झाली असून यानिमित्त पुढील सलग दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणचे चर्च आकर्षक रोषणाई आणि येशू खिस्त जन्माच्या आकर्षक देखाव्यांनी सजले आहेत. यानिमित्त बाजारात ख्रिसमस ट्री अन् वेगवेगळ्या गिफ्टस्ची रेलचेल झाली आहे.

दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली की, प्रत्येकाला नाताळ आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या थर्टी फर्स्टचे वेध लागलेले असतात. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सारे घटक एकत्र येऊन तो साजरा करतात. नाशिकरोड, शरणपूर रोड भागात ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांसह राजकीय नेत्यांनीही गर्दी केली होती. नाताळच्या पाश्र्वभूमीवर, सध्या शरणपूर रस्त्यावरील सेंट आंद्रिया चर्च, त्र्यंबक नाका चौकातील होलीक्रॉस चर्च, नाशिकरोड येथील सेंट झेवियर्स चर्च, जेलरोडवरील सेंट अ‍ॅना, देवळाली कॅम्पस्थित सेंट पॅट्रिक चर्च आदी ठिकाणी ख्रिस्त जन्माचे आकर्षक देखावे साकारण्यात आले. बहुतेक चर्च नेत्रदीपक रोषणाईने झगमगले आहेत. ख्रिसमस ट्री, रंगबेरंगी चमकणाऱ्या पताकांमुळे रोषणाईत वेगळेच रंग भरले गेले. ठिकठिकाणच्या चर्चेमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. रात्री ख्रिस्तजन्माचा सोहळा झाल्यानंतर सकाळी बहुतेक ठिकाणी महाभक्ती अर्थात सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. आनंद मेळा, विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा, चर्चच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घरातही देखावे साकारताना कुटुंबीयांनी अधिकाधिक कल्पकता आणण्याचा प्रयत्न केला. नाताळनिमित्त सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तूंनी दुकाने सजली आहेत. महत्वाची बाब म्हणजे, हा सण केवळ ख्रिश्चनधर्मीय नव्हे, तर सर्व घटक मोठय़ा उत्साहाने तो साजरा करीत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. नाताळनिमित्त ५० ते तीन हजार रुपयांपर्यंत ख्रिसमस ट्री, २० ते एक हजार रुपयांपर्यंतच्या किमतीच्या बेल्स, ट्री सजावट साहित्य, म्युझिकल लाइटिंग, पुतळा आदी वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिक शहरातील बडय़ा व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सांताक्लॉजला आणण्याचा मार्ग स्वीकारला. एकूणच नाताळामुळे वातावरण वेगळ्याच उत्साहाने भारले आहे.

मनमाडमध्ये विविध कार्यक्रम

मनमाड शहरात नाताळ सणाला उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त रविवारी मध्यरात्री विविध चर्चमधून प्रार्थना करण्यात आली. मध्यरात्री बाराच्या सुमारास शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विविध चर्चमध्ये आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. रात्री फटाक्यांच्या आतषबाजीने शहर दणाणून गेले. कडाक्याच्या थंडीत ख्रिस्तीबांधव, आबालवृद्ध, महिला मोठय़ा संख्येने नवे कपडे परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले. यानिमित्त चर्चला आकर्षक रोषणाई, आंतरभागात सजावट करण्यात आली. सेंट झेवियर्स चर्चमध्ये येशूच्या गव्हाणीचा देखावा तयार करण्यात आला आहे.  ख्रिसमस ट्री, विविधरंगी चांदण्याचे आकाशकंदील, बेल्सची सजावट, शांताक्लॉज, भेटवस्तू यांसारख्या सजावटीच्या वस्तुंसह विविध खाद्यपदार्थानी दुकाने सजली असून नाताळनिमित्त बाजारपेठेत खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे.