काही दुकानांचे शटर, ओटे काढण्याची करामत

शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, यासाठी महापालिकेने अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर हातोडा उचलला असला तरी या कारवाईत मात्र दुजाभाव केला जात असल्याचे चित्र आहे. मंगळवारी सिडकोतील पवननगर ते उत्तमनगर रस्त्यावर मोहीम राबविण्यात आली. या वेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने काही दुकानांचे थेट लोखंडी दरवाजा (शटर) काढून घेण्याची करामत केली. परिसरातील दुकानांसमोर ओटय़ांचे बांधकाम करण्यात आले आहे. काही दुकानांसमोरील हे ओटे हटविले, तर काही दुकानांसमोरील ओटय़ांना ‘जैसे थे’ ठेवले गेले. कारवाईत दुटप्पीपणा झाल्याचा आक्षेप व्यावसायिकांनी नोंदविला.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने प्रमुख रस्त्यांवर अनधिकृत बसणारे विक्रेते, अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेतले आहे. त्या अंतर्गत आठवडाभरापासून वेगवेगळ्या भागांत कारवाई केली जात आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक आदी ठिकाणी अतिक्रमणे करून व्यवसाय करणारे भाजी, फळ विक्रेते, टपरीधारक, तत्सम व्यावसायिकांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे दूर झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी पालिका सोईसोईने कारवाई करीत असल्याची बाब सिडकोतील कारवाईतून समोर आली. पवननगर ते उत्तमनगर हा या परिसरातील मुख्य मार्ग. सिडकोतील निवासी घरांचे अनेकांनी दुकानात रूपांतर केले आहे. या मार्गावरील काही चौकांत ठाण मांडणाऱ्या विक्रेत्यांची संख्या कमी नाही. सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तात दाखल झाल्यावर छोटय़ा विक्रेत्यांची एकच तारांबळ उडाली. अनेकांनी आपला माल घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. छोटय़ा विक्रेत्यांसह पथकाने दुकानांसमोर बांधलेले ओटे हटविण्याचे काम हाती घेतले. काही दुकानांचे ओटे हटविले जायचे तर काही दुकानांचे ओटय़ांकडे

दुर्लक्ष करण्याचे धोरण पथकाने स्वीकारले.

हितसंबंधी, परिचित व्यापाऱ्यांच्या दुकानांना ओटे जैसे थे ठेवण्याची मुभा दिली गेली. इतरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची तक्रार अनेकांनी केली. स्थानिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत पथकाने अखेपर्यंत कारवाईत हाच कित्ता गिरविला. पवननगर भागात काही दुकानांवर कारवाई करताना पथकाने अचाट कामगिरी केली. अन्य दुकानांच्या तुलनेत आतमध्ये असणाऱ्या तीन ते चार दुकानांचे लोखंडी दरवाजे काढण्यात आले. ही दुकाने पालिकेला अनधिकृत बांधकाम वाटतात तर ते त्यांनी जमीनदोस्त केले असते. परंतु, तसे न करता लोखंडी दरवाजा काढण्याचा अधिकार पालिकेला कोणी दिला, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला. दुकानाचे शटर काढल्याने आतील मालाचे काही नुकसान झाल्यास, तो चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी पालिकेवर असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. कारवाईत दुजाभाव केल्यामुळे नागरिकांनी पथकाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.