बसस्थानक परिसारत जंतुनाशक फवारणी, नागरिकांच्या मनात भीती कायम

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शिक्षण विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. याशिवाय अन्य माध्यमातून करोनाविषयी दक्षता घेण्यात येत असली तरी नागरिकांच्या मनात करोनाविषयी भीती कायम आहे. याचा परिणाम पर्यटन तसेच प्रवासावर होत आहे. त्यामुळेच एरवी गर्दीने गजबजलेली बस स्थानके सध्या प्रवाश्यांच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र जिल्ह्य़ात दिसत आहे.

करोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहनने देखील खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. गर्दीच्या बस स्थानकावरील बैठक व्यवस्था दिवसातून दोन ते तीन वेळा जंतुनाशक द्रव्याने पुसली जात आहे. स्थानक परिसरात जंतुनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. शिवशाही बसमधील वाहकाकडे सॅनिटायझर द्रव्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच उद्घोषणेच्या माध्यमातून करोनापासून काळजी घेण्यासाठी काय करावे, याची सुचना करण्यात येत आहे.

राज्य परिवहनतर्फे उपाययोजना करण्यात येत असल्या तरी प्रवाश्यांमध्ये या आजाराचा वाढता फैलाव पाहता कमालीेची भीती आहे. करोनाग्रस्त रुग्णांची पुण्यातील वाढलेली आकडेवारी पाहता तीन ते चार दिवसात पुण्याहून नाशिकला येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची वाढली आहे. नाशिकहून पुण्याकडे केवळ कामानिमित्त जाणारे प्रवासी आहेत. शनिवारी सायंकाळी शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर करण्यात आल्याने काहींनी ‘गडय़ा आपला गाव बरा’ म्हणत बस स्थानक गाठले. यामुळे  शनिवार आणि रविवारी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. सोमवारी याउलट परिस्थिती दिसून आली. करोनाचा वाढता आकडा, वेगवेगळ्या शहरांमध्ये लाागणारे जमावबंदीचे आदेश पाहता काहींनी घरीच राहणे पसंत केले. यामुळे महामंडळाच्या गाडय़ा प्रवाशांच्या प्रतिक्षेत बस स्थानक परिसरात उभ्या राहिल्या. अनेक बस या नियमित वेळेपेक्षा उशीराने निघाल्या. बस स्थानक परिसरात अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाला सुती रुमाल लावले होते. त्यावर काहींनी कापूरची बारीक पूड  किंवा निलगिरी तेल लावले होते. बस स्थानक परिसरातही जंतुनाशक फवारणीचा वास येत राहिला.

शाळा-महाविद्यालयांमुळे काही बस फेऱ्या रद्द

राज्य शिक्षण विभागाकडून ३१ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केल्याने परिवहन महामंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या बसा फेऱ्या रद्द केल्या आहेत. तसेच यंदाचा चैत्रोत्सव करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाल्याने श्री सप्तश्रृंगी गडावरील यात्रेसाठी होणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्याचे राज्य परिवहन महामंडळाचे नियोजन  आहे.