शहर व ग्रामीण भागात टंचाईचे सावट गडद झाले असताना शासकीय पातळीवर नेहमीच्या पठडीत आवाहन करत जलजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली. या वेळी पाणी बचतीचे महत्त्व, पर्यावरणातील असमतोलामुळे पर्जन्यावर झालेला परिणाम, भूजल पातळी वाढविणे.. अशा विविध विषयांवर मान्यवरांनी मंथन केले. नाशिक शहरासह ग्रामीण भागात टंचाईचे संकट तीव्र झाले असताना जलजागृतीबाबतचे हे आवाहन म्हणजे ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार’ असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे.

जिल्ह्यातील कडवा, दारणा, गोदावरी, आळंदी, कोळवण, कादवा, उनंदा, पांझण, गिरणा, आरम, मोसम या ११ नद्यांच्या पाण्याने भरलेल्या कलश पूजनद्वारे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. एम. शिंदे, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. गंगापूर धरणाने तळ गाठल्यामुळे नाशिक शहरातील पाणीकपातीत वाढ करणे क्रमप्राप्त ठरले आहे. सद्य:स्थितीत दैनंदिन पाणीपुरवठय़ात १५ टक्के कपात आणि आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. परंतु धरणातील पातळी खालावल्याने आठवडय़ातून दोन ते तीन दिवस कपात करणे भाग पडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मनमाडला तर एक वेळच्या पाण्यासाठी दहा ते पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागते. इतर तालुक्याच्या ठिकाणी आणि गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वेगळी स्थिती नाही. वर्षांनुवर्षे भेडसावणाऱ्या या प्रश्नावर टँकरद्वारे पाणी देऊन तोडगा शोधला जातो. या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न होत नसताना जलजागृती अभियानाद्वारे दुष्काळात पाणी बचतीचे पाठ दिले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

शंभरकर यांनी पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता येत्या काळात पाणी बचतीकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागाला टंचाईचा अधिक सामना करावा लागत आहे. या समस्येच्या मुळाशी गेल्यास पर्यावरणातील असंतुलनामुळे पावसाचे वेळापत्रक बदलल्याचे लक्षात येईल.

टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी पर्यावरणरक्षणाचा भाग म्हणून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी सर्वानी कटिबद्ध व्हावे आणि वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने पाणी बचतीचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले. बगाटे यांनी पाणी जमिनीत मुरवून त्याचा साठा वाढविण्यासाठी शाश्वत पद्धतीचा उपयोग करणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधले.

शासनाने याच उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. जिल्ह्य़ात अभियानांतर्गत ३७५० कामे पूर्ण झाली आहे. या कामातून निर्माण होणाऱ्या जलसाठय़ातून ३० हजार हेक्टर शेतीला एक वेळ पाणी देता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवार यांनी जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे सांगितले.

पाणी बचतीतून पाणी साठय़ात वाढ करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. प्रति व्यक्ती १०० ते १२५ लिटर पाणी पुरेसे असताना शहरी भागात २०० ते २२५ लिटर पाण्याचा वापर केला जातो. शेतीतही सूक्ष्म सिंचनाद्वारे ८० टक्के पाण्याची बचत शक्य आहे.

पाणी बचतीच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी सर्वानी जलदूताची भूमिका निभवावी असे आवाहन त्यांनी केले. शिंदे यांनी पाणी वापरात काटकसर आवश्यक असल्याचे सांगितले. मिसाळ यांनी जलयुक्त शिवार अभियानाने लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.