काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

नाशिक : जलवाहिन्यांमधील गळती रोखणे आणि महावितरणच्या देखभाल दुरुस्तीची कामे यामुळे शनिवारी संपूर्ण शहरातील दोन्ही वेळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी नाशिकरोड भागात पाणीपुरवठा होणार नाही. उर्वरित भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महाालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.

गंगापूर धरण केंद्रातून पाणी उचलून महाापालिकेच्या बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर, नाशिकरोड या जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. धरणातील पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीला गंगापूरच्या मुक्त विद्यापीठ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ही गळती थांबविणे आवश्यक असल्याने शनिवारी गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. तसेच गंगापूर धरणातून नाशिकरोडच्या जलशुद्धीकरण केंद्रास पाणी नेणाऱ्या वाहिनीतून भारत प्रतिभृती मुद्रणालयाच्या आवारात गळती होत आहे. ही गळती बंद करण्याचे काम शनिवारी केले जाईल. या शिवाय गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात नवीन पंप जोडणीचे काम केले जाणार आहे. उपरोक्त कामांमुळे या ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

महापालिकेच्या मुकणे धरण पंपिंग स्टेशनला महावितरणच्या रेमंड उपकेंद्रातून वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे. या उपकेंद्रावर विद्युत विषयक कामे करण्यासाठी शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करता येणे शक्य होणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. यामुळे गंगापूर, मुकणे धरण आणि चेहेडी पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास शनिवारी सकाळी आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी नाशिकरोड वगळता उर्वरित भागास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नाशिकरोड परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.