News Flash

कचरा, पथदिवे, पाण्याची समस्या

दाट लोकवस्ती असलेल्या या प्रभागात रस्त्याच्या सिमेंटीकरणावर भर देण्यात आला .

 

प्रभाग क्रमांक २२

पूर्व आणि मध्य नागपूरला जोडणाऱ्या या प्रभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. भाजपचे वर्चस्व असले तरी अपक्ष उमेदवार या प्रभागात निवडून आला आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या प्रभागात रस्त्याच्या सिमेंटीकरणावर भर देण्यात आला असला तरी कचरा, पथदिवे आणि पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. अयाचित मंदिरला लागून असलेल्या नाल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून छत टाकण्याचा प्रस्ताव असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

जुन्या रचनेनुसार महात्मा गांधी प्रभाग क्रमांक ३९असून आता या वस्तीला प्रभाग ४२ आणि ३७ चा काही भाग जोडण्यात आला आहे. प्रभागाची लोकसंख्या ६९ हजार आहे. विविध जाती धमार्र्चे स्थान असलेल्या या प्रभागातील काही वस्त्यामध्ये डांबरी रस्त्यांची स्थिती फारच खराब आहे. झोपडपट्टीबहुल भाग असलेल्या वस्तीमध्ये अजूनही रस्ते तयार करण्यात आले नाहीत. या प्रभागात नागनदीच्या समांतर असलेला नाला आहे पण पावसाळ्यात हा नाला पाण्याने भरल्यानंतर अनेकांच्या झोपडय़ामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. दाट वस्ती असली तरी अनेक लोकांनी घराच्या शेजारी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. नबाबपुरा, नटराज चित्रपटगृह, लाकडीपूल, हत्तीनाला या भागात डांबरी रस्ते आहेत, मात्र त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. अयाचित मंदिराला लागून असलेल्या नाल्याच्या अवतीभोवती कचरा घर असून त्या ठिकाणचा कचरा दोन दिवस उचलल्या जात नाही. या प्रभागात महापालिकेच्या चार शाळा आहेत मात्र त्यातील तीन शाळा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. काही वस्त्यांमध्ये सांडपाणी व मलवाहिनीची समस्या  आहे.

प्रभागातील वस्त्या

क्वेटा कॉलनी, लकडगंज विभागाय कार्यालय, पाटीदार भवन, आदर्शनगर, चिंतेश्वर मंदिर, बालाजी मंदिर चौक, जैन दवाखाना, जुनी मंगळवारी, मट्टीपुरा, सुदर्शन कॉलनी, मिशनरी स्कूल, ज्ञानेश्वर मंदिर, जैसवाडी, नबाबपुरा, नटराज सिनेमा, अयाचित मंदिर, लाकडीपूल, संघ बिल्डींग, हत्तीनाला, भोसलावेद शाळा, जुना बगडगंज, गंगाबाई घाट, सामॉल फॅर्टरी एरिया, बापूराव गल्ली, इतवारी हायस्कूल, कुंभारपुरा.

अनेक वस्त्यांमध्ये पाणी समस्या 

प्रभागात मलवाहिनीची समस्या असून पावसाळ्यात पाणी साचले की लोकांच्या घरात पाणी जाते. नाल्याचे बांधकाम करण्यात आले नाही. या भागात पथ दिव्यांची आणि कचऱ्याची मोठी समस्या असून दोन दिवसातून एकदा वस्तीमध्ये गाडी फिरत असल्यामुळे नागरिकांच्या घरी कचरा पडून राहतो. रस्ता रुंदीकरणाची काम करण्यात आली नाहीत. अनेक लोकांनी अतिक्रमण केले असून त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही. बुजलेल्या सार्वजनिक विहिरी स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या आहे.

गीता छाडी, पराभूत उमेदवार

 

विकास कामांना प्राधान्य

गेल्या साडेचार वषार्ंत ७ ते ८ कोटींची कामे करण्यात आली आहे. काही वस्त्यांमध्ये सिमेंटीकरण करण्यात आले तर काही वस्त्यांमध्ये काम शिल्लक आहे. नाल्यावर छत टाकण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. पाण्याची आणि पथदिव्याची प्रत्येक वस्तीमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेची जुनी शाळा असताना ती गेल्या अनेक वषार्ंपासून बंद होती. शाळेची इमारत जीर्ण झाली होती त्यामुळे ती पाडण्यात आली. त्या ठिकाणी नव्याने इमारत बाधून कौशल्य विकासाच्या दृष्टीने कार्यशाळा सुरू करण्याचा मानस आहे. डांबरीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. दाट लोकवस्ती असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचणी येतात, त्यामुळे या भागात विकास करण्याच्या दृष्टीने अडचणी आहेत. जवळपास ७० टक्के कामे झाली असून त्यात मूलभूत विकास कामांना प्राधान्य देण्यात आले.

वंदना इंगोले, नगरसेवक

 

कचरा दोन दिवस पडून 

आमच्या वस्त्यामधील कचरा दोन दिवस उचलला जात नाही. अनेकदा नगरसेवकांकडे तक्रार केली तर कचरा उचलला जातो. पावसाळ्यात आमच्या वस्तीमध्ये पाणी भरल्या जाते. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी सकाळच्यावेळी येत असते. समस्या अनेक आहेत. निवडणूक आल्या की मते मागायला येतात, मात्र नगरसेवक वस्तीमध्ये याऊन पाहात नाही.

मालती उरकुडे, गृहिणी

 

बंद शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव

प्रभागात आतापर्यंत ८ ते ९ कोटींची कामे कामे करण्यात आली, शिवाय आमदार निधीतून अडीच कोटींची कामे झाली आहे. प्रभागात सिमेंट रस्त्यासोबत हत्तीनाल्यावर छत टाकण्यात आले. प्रभागात असलेल्या विहिरी स्वच्छ करण्यासोबत वाचनालयाची निर्मिती

करण्यात आली आहे. बापुरावगल्ली, इतवारी हायस्कूल, कुंभारपुरा या भागात विकास कामे करण्यात आली आहे. या प्रभागात उद्यान आणि रुग्णालय नाही. महापालिकेच्या तीन शाळा आहेत. मात्र, त्या शाळा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत.  त्या शाळांमध्ये विविध विकास प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला आहे.

राजेश घोडपागे, नगरसेवक

 

वस्त्यांमध्ये पथदिवे, मैदान, दवाखाना नाही

प्रभागात सिमेंट रस्त्याची कामे करण्यात आली असली तरी रस्त्यावरील पथदिव्याची समस्या मात्र कायम आहे. अनेक वस्त्यामध्ये पथदिवे नाही. या भागात खेळण्यासाठी मैदान नाही. महापालिकेचा दवाखाना नाही. त्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. धापोडकर मोहल्लामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा येतो त्यामुळे भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नगरसेवकांनी आश्वासन दिले असताना रस्त्याची आणि मलवाहिनीची समस्या आहे. कचऱ्याची आणि पथदिव्याची समस्या मात्र कायम आहे. रात्रीच्यावेळी अनेक वस्त्यामध्ये अंधार असतो त्यामुळे त्यांनी तात्काळ व्यवस्था करण्याची गरज आहे.

प्रमोद माकडे, नागरिक, सुदर्शन कॉलनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:27 am

Web Title: civilians problem in nagpur ward 22
Next Stories
1 रखडलेल्या बांधकामांचा मार्ग खुला
2 महिन्यानंतरही एटीएम बंदच
3 मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचा मोर्चा
Just Now!
X