28 October 2020

News Flash

भाजप पदाधिकारी-पोलीस यंत्रणेत खटके

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार

इंदिरानगर येथील साईनाथ चौफुली येथे भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदेंसह इतर पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाले.       (छाया- यतीश भानू)

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार

नाशिक : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचा आरोप करीत सोमवारी भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनावेळी पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडाले. इंदिरानगरातील साईनाथ चौफुली येथे आंदोलनास जमलेल्या महिलांना पोलिसांनी जमावबंदीचे कारण देऊन पिटाळले. काहींना या भागाकडे येण्यास प्रतिबंध करण्यात आला. यामुळे आमदार देवयानी फरांदे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचे पोलिसांशी शाब्दिक खटके उडाले. अखेरीस पदाधिकाऱ्यांनी साईनाथ चौफुलीवर ठिय्या देत महाविकास आघाडीवर शरसंधान साधले. पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. पंचवटी कारंजा, मेहेर आणि अन्यत्र आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतले.

महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.  मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नसल्याने सरकारच्या विरोधात भाजपने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन पुकारले. शहरात भाजपच्या १० ही मंडळात मुख्य चौकांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले या आमदारांसह महानगराध्यक्ष गिरीश पालवे, महिला मोर्चाच्या हिमगौरी आडके यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगरच्या साईनाथ चौफुलीवर आंदोलन होणार होते. त्या अनुषंगाने जमलेल्या महिलांना पोलिसांनी जमावबंदीचे कारण देऊन माघारी पाठवले. या भागात आंदोलकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. या घटनाक्रमाची माहिती समजल्यानंतर आमदार फरांदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी चौकात दाखल झाले. त्यांचे पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद झाले. पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने केला. अखेर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चौकात आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. घोषणाबाजी केली.

सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर येथे आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महिलांवरील अत्याचारात वाढ होत असून राज्यात अनेक निष्पाप महिलांनी या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे हिरे यांनी सांगितले. पंचवटीत आमदार राहुल ढिकले, हिमगौरी आडके यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी करण्यात आली. विविध घटनांकडे फलकाद्वारे आंदोलकांनी लक्ष वेधले.

आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दुर्दैवी

आंदोलनाद्वारे महिलांवरील अन्यायाकडे लक्ष वेधले जाणार होते. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने ठोस पावले उचलणे अभिप्रेत आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकारने पोलिसांच्या माध्यमातून महिलांना रस्त्यावर येण्यापासून रोखले. आंदोलन चिरडण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवी आहे. दडपशाहीला न जुमानता आम्ही आंदोलन केले.

– आ. देवयानी फरांदे (प्रदेश सरचिटणीस, भाजप)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 12:05 am

Web Title: clashes between bjp workers police in nashik during protest against women atrocity zws 70
Next Stories
1 त्र्यंबक परिसरात कीटकभक्षी गवती दवबिंदूचा बहर
2 ‘सीबीएससी’कडून गुणपत्रिका न मिळाल्याने १० वी, ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपुढे संकट
3 बिबटय़ाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी
Just Now!
X