दुष्काळामुळे आदिवासी व अतिदुर्गम भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी गैरसोय आणि त्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबविण्यासाठी येथील सोशल नेटवर्किंग फोरम या सेवाभावी संस्थेने हरसूल परिसरातील जवळपास ५२ टंचाईग्रस्त गावांसाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण या टंचाईग्रस्त गावात फोरमने अवघ्या सहा लाख रुपयात उभारलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण सोहळ्यात हा संकल्प जाहीर करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे, तोरंगणप्रमाणेच समाज माध्यमांच्या मदतीने उपरोक्त संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी देश-परदेशातील देणगीदारांची मदत घेण्यात येणार आहे.
तोरंगणच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतिलाल टाटीया, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सरपंच रामदास बोरसे, फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रास्ताविकात गायकवाड यांनी संस्थेची भूमिका, उद्दिष्टे व संकल्पना स्पष्ट केली. तोरंगण प्रकल्पात गावाची निवड, आलेल्या अडचणी व नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकल्याचे नमूद केले.
अतिरिक्त आयुक्त सोनवणे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांनी शासकीय योजनांच्या भरवशावर न राहता स्वत:च्या हिमतीवर व सर्वाच्या सहकार्यातून असे प्रकल्प उभारावेत असे आवाहन केले. आदिवासी वाडी वस्तीवरील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन ज्या ठिकाणी लोकसहभाग मिळेल, अशा ५२ गावांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला.
त्याकरिता समाज माध्यमाद्वारे देश व परदेशातील देणगीदार जोडण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या वेळी डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मितेश मुथा, अ‍ॅड. गुलाब आहेर, डॉ. उत्तम फरताळे आदी उपस्थित होते.

एक रुपयात २० लिटर
पाण्याचे महत्त्व नागरिकांना असावे आणि त्याचा अपव्यय होऊ नये यासाठी तोरंगण जलशुद्धीकरण प्रकल्पावर पाण्याचे एटीएम यंत्र बसविण्यात आले आहे. त्याद्वारे एक रुपयात २० लिटर शुद्ध पाणी मिळणार असून, वापराचे पाणी मोफत व मुबलक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन स्थानिक बचत गटाकडे सोपविण्यात आले. हा प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राहुल बोरसे याचा या वेळी सत्कार करण्यात आला.