जिल्ह्यातील गडकोट आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे कळवण तालुक्यातील बाबापूर गावाजवळील मरकडेय गडावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. किल्ला संवर्धनातील हा जिल्हय़ातील २८ वा गड-किल्ला आहे. या वेळी श्रमदानाच्या माध्यमातून गडावरील अर्धा टन कचरा जमा संकलित करण्यात आला.
समुद्रसपाटीपासून ४३८४ फूट उंचावर असणाऱ्या या किल्ल्याची बिकट अवस्था झाली आहे. वन विभागाने केवळ लोखंडी जाळ्या आणि बसण्यासाठी बाकडे टाकली. गडावर जाण्यासाठी कोणताही माहिती फलक नाही. गडावर सोयीसुविधांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर होत असताना तो कुठे जातो, असा प्रश्न येथील समस्या दृष्टिपथास पडल्यावर उपस्थित होतो. गडावरील कडय़ाखाली कातळात कोरलेले दोन भुयारी मार्ग आहेत.
या ठिकाणी माहिती फलक नसल्याने पर्यटक आत उतरून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गडावरील तळी, भुयारी मार्ग व गुंफांचा अभ्यास होणे आवश्यक असून यामुळे नवीन माहिती मिळण्याची शक्यता परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करतात. हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. अनेक प्रकारचे पक्षी, वनस्पती येथे पाहावयास मिळतात. या मोहिमेत दुर्मीळ पालदेखील पाहावयास मिळाली. प्रतिष्ठान ‘बॉटनी’ विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गडावरील वन्यजीव, वनफुले, कीटक-पक्षी, वृक्ष आदींची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करणार आहे.गडावर भ्रमंतीसाठी येणारे पर्यटक व भाविकांनी स्वच्छता राखण्याची दक्षता घेतली नाही. परिणामी, सर्वत्र प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक कॅरी बॅग, पत्रावळी, द्रोण, काचेच्या बाटल्या आदींचा खच पडलेला होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, पक्षिप्रेमी भीमराव राजोळे, सागर बनकर, दर्शन घुगे, आशीष बनकर, रोशन पेनमहाले, धनंजय बागड, अजित जगताप, समीर ठाकूर आदींनी स्थानिक युवकांच्या मदतीने हा कचरा संकलित केला. गडावर बारमाही तळी आहेत. या ठिकाणी भुयारी कुंडही पाहावयास मिळते. शिखरावर मरकडेय ऋषींचे मंदिर आहे.
तसेच दत्त मंदिर व देवीचे मंदिरही आहे. या गडाच्या इतिहासात डोकावल्यास त्याचे पूर्वीचे नाव मयूरखंडी असे होते. हा गड शिवाजी महाराज यांच्या ताब्यातही होता. नंतर इंग्रज-मराठे युद्धात हा प्रदेश व गड इंग्रजांनी ताब्यात घेतला आणि जाताना तो पूर्ण उद्ध्वस्त करून गेल्याचे चित्र आजही येथे दिसते.
वन विभागाने या किल्ल्याच्या संवर्धन आणि भाविकांच्या मार्गदर्शनासाठी योग्य ती दक्षता घेण्याची गरज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू