प्रवेशद्वार बंदमुळे व्हरांडय़ात ठाण मांडून घोषणाबाजी

शहर स्वच्छतेसाठी आऊटसोर्सिग पद्धतीने ७०० सफाई कामगारांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर, बुधवारी सफाई कामगारांनी पालिकेतील सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत शिरकाव करत गोंधळ उडवून दिला. या अनपेक्षित प्रकाराने सभागृहातील कामकाजातही व्यत्यय आला.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात साफसफाईची लगबग सुरू असली तरी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग अद्याप कायम आहेत. शहराच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत असल्याचे सांगून प्रशासनाने २० कोटीहून अधिकचा प्रस्ताव सादर केला.

पालिकेत १९९३ सफाई कामगारांची पदे मंजूर आहेत. स्वच्छतेची कामे करण्यास हे मनुष्यबळ कमी पडते. म्हणून आऊटसोर्सिगद्वारे ठेकेदारामार्फत ७०० कामगार नियुक्त करण्यासाठी २१ कोटी खर्चाचा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर केला आहे. याची माहिती मिळताच सफाई कामगारांनी थेट महापालिकेत  जाऊन गोंधळ घातला.

पुढील सप्ताहात शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीचा दौरा होणार आहे. सत्ताधारी भाजपने युद्धपातळीवर स्वच्छता करण्याची धडपड चालवली आहे. मुख्य रस्त्यावरील दुभाजकाची साफसफाई, भिंतीला नवीन रंग रंगोटी आदी कामे सुरू आहेत. तर दुसरीकडे पाहणी दौऱ्यात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे.

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आणि पालिका आयुक्त यांच्यातील वादानंतर महापालिकेत काही महिन्यांपूर्वी थेट बंदुकधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली गेली आहे. नागरिकांना पालिकेत जाताना प्रवेशद्वारावर अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. ओळखपत्रही दाखवावे लागते. पालिकेची सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली जात असताना सफाई कामगार थेट सभागृहापर्यंत धडकले कसे याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सुरक्षा यंत्रणेची धावपळ

सभेचे कामकाज पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरीकडे जाण्याचा सफाई कामगारांचा प्रयत्न होता. परंतु, त्याचे प्रवेशद्वार बंद असल्याने त्यांनी वऱ्हांडय़ात ठाण मांडून घोषणाबाजी सुरू केली. अकस्मात घडलेल्या या घटनाक्रमाने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. सफाई कामगारांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. सभागृहातील चर्चा प्रेक्षकगृहातून पाहू देण्याची मागणी त्यांनी केली. परंतु, सुरक्षा अधिकाऱ्यांनी ते अमान्य करत सर्व कामगारांना बाहेर नेले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी धाव घेतली. अनेक वर्षांपासून महापालिकेत काम करूनही आमचे प्रश्न सोडविले जात नसल्याची तक्रार करत कामगारांनी यावेळी केली.