बदलणाऱ्या जीवन शैलीमुळे वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागते. वेळोवेळी येणाऱ्या साथी तसेच संसर्गजन्य आजारातून बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. मात्र कालानुरूप वैद्यकीय क्षेत्रात विविध शाखांचा अंतर्भाव झाला. या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेत ‘क्लिनिकल ट्रायल डिपार्टमेंट’ ही संकल्पना मांडली असून या माध्यमातून विविध विद्याशाखांचा समन्वय साधत रुग्णांसाठी उपचार पद्धतीत बदल कसे करता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील तीन महाविद्यालयांनी त्याबाबत विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठविले आहेत.

वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी तसेच आरोग्यविषयक प्रश्नांचा सखोल अभ्यास करता यावा यासाठी आरोग्य विद्यापीठाने नव्या आराखडय़ात उपग्रहाच्या मदतीने शिक्षण, रुग्ण-वैद्यकीय अधिकारी यांच्यात सुसंवाद यासह वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आहेत. ग्रामीण भागात अधिकाधिक आरोग्य सेवा पोहचाव्यात यावर लक्ष केंद्रित करताना विद्यापीठाने आयुर्वेद, युनानी, अ‍ॅलोपॅथी आणि होमियोपॅथी या वेगवेगळ्या पॅथींचा अभ्यास, चिकित्सा करत रुग्णांना लवकर बरे वाटावे यासाठी विविध पॅथींचा एकत्रित अभ्यास करता यावा म्हणून ‘क्लिनिकल ट्रायल डिपार्टमेंट’ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातुन आयुर्वेदातील क्षार चिकित्सा, सुश्रृत व चरक यासह अन्य काही पध्दतीचा अ‍ॅलोपॅथीसह अन्य काही पॅथींत कसा समावेश करता येईल या अनुषंगाने संशोधन व अभ्यास करता येणार आहे. विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित महाविद्यालयाने मागणी केल्यास ‘क्लिनिकल ट्रायल डिपार्टमेंट’ अर्थात संशोधन केंद्र सुरू करता येईल. राज्य शासनाने ज्या ठिकाणी महापालिकेच्या सहकार्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली आहे, त्या ठिकाणी यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नाशिकसह दोन ठिकाणाहून या संदर्भात प्रस्ताव आले आहेत.

‘क्लिनिकल ट्रायल डिपार्टमेंट’मधून आयुर्वेदासह सर्व विद्याशाखांमध्ये योग्य समन्वय साधत कमी वेळात रुग्णाला बरे कसे करता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. मुख्यत आयुर्वेदातील चरकसह वेगवेगळ्या चिकित्सांचा वापर त्यात होईल.

-डॉ. दिलीप म्हैसकर (कुलगुरू, आरोग्य विद्यापीठ)