व्यसनमुक्ती संघटनांच्या बैठकीत मागणी

साखर कारखान्यांशी संलग्न दारू दुकाने व खासगी दारू उत्पादन करणारे सर्व कारखाने बंद करून संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे दारूबंदी करावी अशी मागणी जिल्हा नशाबंदी मंच आणि व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या समविचारी संघटनांच्या बैठकीत करण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्रात त्वरित दारूबंदी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी हुदलीकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देताना सुखी व संपन्न देशाचे व राज्याचे स्वप्न स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिले होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक तालुका, गावात शासनाने अधिकृतपणे देशी दारू विक्रीची दुकाने सुरू केल्यामुळे युवा पिढी बरबाद झाली असल्याचे मत मांडले. जिल्हा नशाबंदी मंचचे अविनाश आहेर यांनी महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी जाहीर केली असली तरी अजूनही ही बंदी १०० टक्के झाली नसल्याचे नमूद केले. लाखो रुपयांचा माल पकडला जात असल्याने गुटख्याचे उत्पादन, वितरण व विक्री ही व्यवस्था पोलीस यंत्रणेपेक्षा जास्त सक्षम व सूत्रबद्ध असल्याचे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्रात प्रभावीपणे गुटखाबंदी राबवावी आणि दारूबंदी करताना हातभट्टीची दारू, भिलाटीतील दारूचे उत्पादन यावर प्रभावीपणे कठोर कार्यवाही करून बंदी आणावी, तरच भविष्यातील युवा पिढी सक्षम होईल असे सांगितले. महाराष्ट्रात दारूबंदीच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात विविध मागण्यांचा समावेश असून त्यात बिहारने दारू विक्रीतून मिळणाऱ्या कोटय़वधींच्या महसुलावर पाणी सोडत दारूबंदीचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम शासकीय दारूची दुकाने बंद करावीत, साखर कारखान्यांशी संलग्न असणारे व खासगी दारू उत्पादन करणारे सर्व कारखाने बंद करून संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे दारूबंदी राबविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, उत्पादन शुल्क विभागास अधिकार वाढवून द्यावेत, यासारख्या मागण्यांचा समावेश आहे.

निवेदनावर हुदलीकर, आहेर, पां. भा. करंजकर आदींची स्वाक्षरी आहे. या वेळी करंजकर, महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघटनेचे गं. पा. माने, शासकीय कर्मचारी संघटनेचे नेते राम गायटे यांनीही मनोगत व्यक्त केले.