नाशिक : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी होणारा ‘रोड शो’ शहराचे रूपडे पालटण्यास हातभार लावणार आहे. पावसाळ्यातील खड्डेमय रस्ते, सर्वत्र मोकाट फिरणारे जनावरे, रस्त्यावरील बंद पथदीप असे सामान्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न एका झटक्यात मार्गी लागणार असून मुख्यमंत्र्यांचा हा दौरा शहरवासीयांसाठी वेगळीच अनुभूती देणारा  ठरणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने होत आहे. तत्पूर्वी, म्हणजे बुधवारी मुख्यमंत्र्यांचा शहरातील तिन्ही मतदारसंघात रोड शो होणार आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप कामाला लागले आहेत. यात्रेचे पाथर्डी फाटा येथे  दणक्यात स्वागत केले जाणार आहे. तिथून मोटारसायकल फेरी सुरू होऊन अंबक लिंक रोड, उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, दिव्या अ‍ॅडलॅब, सिडको, सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक, मायको सर्कल, तरण तलाव सिग्नल, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, ठक्कर बाजार स्थानक या ठिकाणी समारोप होईल. मुख्यमंत्र्यांचा रोड शो त्र्यंबक नाका सिग्नल येथून सुरू झाल्यावर जीपीओ रस्ता, गंजमाळ, सेना भवन, शालिमार चौक, नेहरू उद्यान, शिवाजी रोड, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा येथे संपणार आहे.

उपरोक्त कार्यक्रमांच्या पाश्र्वभूमीवर, महापौर रंजना भानसी, सभागृह नेता बापू सोनवणे यांनी पालिका अधिकारी, विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांचा रोड शो आणि मोटारसायकल फेरीसाठी महापौरांनी सर्व विभागांना वेगवेगळी कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले. फेरी मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यास सांगण्यात आले. हे काम युद्धपातळीवर सुरू झाल्यामुळे किमान या मार्गावरील खड्डय़ांपासून वाहनधारकांना मुक्तता मिळणार आहे. यात्रेतील रथाला रस्त्यावरील झाडांमुळे अडथळे येऊ नयेत म्हणून झाडांच्या फांद्या कमी करण्याचे सूचित करण्यात आले. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये मोकाट जनावरे सर्वत्र आढळतात. वाहतुकीसह नागरिकांना त्यांचा कमालीचा त्रास होतो. मोकाट जनावरे हटविण्याची सूचना महापौरांनी केली आहे. इतकेच नव्हे, तर रस्त्यावरील पथदीप सुरू ठेवणे, तुंबलेल्या गटारींची स्वच्छता, जलवाहिन्यांची गळती होणार नाही याची दक्षता घेणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री भ्रमंती करणार असल्याने पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. एरवी कितीही मागणी करून न होणारी कामे जलदगतीने होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आगमनामुळे शहराचे रूपडे बदलण्याच्या मार्गावर आहे.

फांद्या तोड कामामुळे कोंडी

मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ ज्या भागातून मार्गस्थ होणार आहे, त्या रस्त्यावरील अडथळा ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. जीपीओ रस्ता, नेहरू उद्यान आदी भागात हे काम करण्यात आले. तोडलेल्या फांद्या रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्या आहेत. या कामामुळे वाहतुकीत अडथळे आले. दुपारी परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली.