पावसाच्या विश्रांतीमुळे मिळालेला दिलासा..पंतप्रधानांना पाहण्यासाठी जमलेली गर्दी..इच्छुकांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आलेले उधाण आणि यातून अखंडपणे होत असलेली घोषणाबाजी, अशा वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनात झालेल्या जाहीर सभेने समारोप झाला.

सभेच्या पाश्र्वभूमीवर, पंचवटीतील तपोवन परिसरास अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. सभेला येणाऱ्यांची काटेकोरपणे तपासणी केली गेली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सभास्थळी पिशवी नेण्यासही बंदी करण्यात आली. सभा शांततेत पार पडल्याने पोलीस यंत्रणेचा जीव भांडय़ात पडला. तपोवनातील मैदानावर झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, खा. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोसले, माजीमंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते. आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी भर पावसात रोड शो केला होता. दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता असल्याने सभेच्या गर्दीवर परिणाम होईल की काय, अशी धास्ती पदाधिकाऱ्यांना वाटत होती. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने चिंता वाढली. पण सभा पार पडेपर्यंत पाऊस झाला नसल्याने सर्वाना हायसे वाटले. शहरी आणि ग्रामीण भागातून पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय जमला. पालकमंत्री गिरीश महाजन हे स्वत: मंडपाबाहेर फेरफटका मारून स्थितीचा आढावा घेत होते.

मंडपात पदाधिकाऱ्यांवर नागरिकांना आसनस्थ करण्याची जबादारी होती. परंतु, बहुतांश जण स्वत:चे छायाचित्र काढण्यात मग्न होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश होता. अनेकांना पंतप्रधान मोदी यांना जवळून पहायचे होते. त्यांनी आसनासमोरील मंडपात स्वतंत्र खुर्ची टाकल्या. गळ्यात भाजपचा दुपट्टा, अतिविशिष्ट व्यक्तीचा पास, डोक्यात पक्षाची टोपी अशा बाजात आलेले अनेक पदाधिकारी सेल्फी काढण्यात मग्न होते. काहींनी गटागटाने फोटो काढले. संबंधितांनी गाण्याच्या तालावर काही काळ ठेकाही धरला. आसन व्यवस्थेची जबाबदारी असणारे घोषणाबाजी, फोटोसेशन आणि परिचितांना जागा मिळवून देण्यात गुंतले होते. पंतप्रधान येण्याआधी खा. सुभाष भामरे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले यांना भाषण करण्याची संधी मिळाली. प्रत्येकाच्या भाषणाची सुरूवात ‘भारत माता की जय’ने केली जात होती. मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे भाषणही त्यास अपवाद राहिले नाही. उलट उभयतांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर उपस्थितांचा प्रतिसाद जाणून घेतला. पंतप्रधानांचे आगमन, भाषण यावेळी समर्थनार्थ प्रचंड घोषणा दिल्या गेल्या. खडसे यांना मात्र भाषणाची संधी दिली गेली नाही. सभामंडपात कमालीचा उकाडा होता. कुटुंबियांसोबत आलेली लहान मुले कंटाळली. कार्यक्रम संपुष्टात येईपर्यंत पाऊस पडला नाही. मात्र, नागरिक मंडपातून बाहेर पडू लागले आणि पावसाला सुरूवात झाली. २० ते २५ मिनिटे चाललेल्या रिपरिपमुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

गर्दी व्यवस्थापनात कसरत

पंतप्रधानांच्या सभेला गर्दी झाली असली तरी तिचे व्यवस्थापन करताना प्रारंभी चांगलीच कसरत झाली. पंतप्रधान येण्याची घटिका समीप येऊनही प्रवेशद्वार, काही विशिष्ट मंडपात आणि ये-जा करण्याचे मार्ग या ठिकाणी गर्दी झाली होती. तपासणीत विलंब होत असल्याची बाब भाजप पदाधिकारी ध्वनिक्षेपकावरुन मांडत होते. अखेरीस पोलीस आयुक्त विश्वास नांगरे व्यासपीठावर आले. त्यांनी ध्वनिक्षेपकावरुन पोलिसांना सूचना दिल्या. गर्दी एकाच जागी थांबवून ठेवू नका. काही मंडपात अधिक गर्दी आहे. त्यांना रिकाम्या असणाऱ्या मंडपात पाठवावे. महिलांच्या पर्स आणि छत्रींना प्रतिबंध करू नका. महिलांसाठी राखीव जागेत त्यांना जाण्यासाठी सहकार्य करा, असे त्यांनी सूचित केले. त्यानंतर काही वेळाने सर्वाना जागा मिळाली.

दुसऱ्या दिवशीही नागरिकांना त्रास

पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी तपोवनच्या आसपासच्या भागातील सर्व मार्गावरील वाहतुकीवर र्निबध घालण्यात आले. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी त्या भागातील रहिवासी आणि ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. आदल्या दिवशी रोड शोमुळे मध्यवर्ती भागात वाहतूक विस्कळीत झाली असतांना गुरूवारी सभेच्या पाश्र्वभूमीवर उपरोक्त भागातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले. यामुळे पंचवटीसह इतर भागातील शाळा, महाविद्यालयाच्या उपस्थितीवर परिणाम झाला. काही शाळा बंद ठेवल्या गेल्या. तर काही शाळांनी मुलांना लवकर सोडून दिले. धुळे, जळगावकडे जाणाऱ्या एसटीबससह अन्य वाहनांना द्राविडी प्राणायाम करावा लागला. मुख्य रस्ते बंद झाल्याने वाहनचालकांकडून पर्यायी मार्गाचा अवलंब झाला.