दौऱ्यावर मुंबईतील पावसाचे सावट; करोनाविषयक आढावा बैठकीस उपस्थिती

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाचा आलेख उंचावत असून बाधितांचा आकडा १८ हजारांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या वेळी पुढे ढकलला गेलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा गुरुवारी होत आहे. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट देऊन स्थितीची माहिती घेतली आहे.

जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या वाढतच असून आतापर्यंत या आजाराने ५४५ जणांचा मृत्यू झाला आहे. १२ हजार २८४ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले. सद्य:स्थितीत चार हजार २९७ रुग्ण उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उंटवाडी रस्त्यावरील करोना काळजी केंद्राचे उद्घाटन होईल. नंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन मुख्यमंत्री मुंबईला मार्गस्थ होतील. शहरात करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी टाळेबंदी लागू करण्याची मागणी केली गेली. यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

करोनाच्या हाताळणीवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी दौऱ्यात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी बहिष्कार टाकला होता. ही बैठक असंवैधानिक असल्याचा भाजपचा आक्षेप होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी बैठक संवैधानिक असून निमंत्रण आल्यास भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील, असे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्यामुळे आदल्या दिवशी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका असे सर्वच शासकीय विभाग युद्धपातळीवर कामाला लागले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामही हाती घेण्यात आले. शासकीय विश्रामगृहात सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली.

करोना हाताळणीत महापालिका, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा यांच्यात समन्वय नसल्याचा अनेकदा आक्षेप घेतला गेला. प्रशासन सर्व विभाग समन्वयाने काम करत असल्याचा दावा करते. मागील बैठकीत शरद पवार यांनी करोनाकाळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे काम कुठेही दिसत नसल्याचा उल्लेख केला होता. आरोग्य विद्यापीठाचे बैठकीत कोणी प्रतिनिधी नसल्याने त्यांना आपली बाजू मांडता आली नाही. नंतर विद्यापीठाने करोनासाठी केलेल्या कामांची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात पवार यांच्यासह आरोग्यमंत्र्यांना पाठविली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस आरोग्य विद्यापीठास निमंत्रित केले जाणार आहे की नाही याची स्पष्टता झालेली नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे लघुसंदेशाद्वारे विचारणा करूनही प्रतिसाद मिळाला नाही. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दुपापर्यंत बैठकीचे निमंत्रण आले नसल्याचे सांगितले. निमंत्रण आल्यास नक्कीच उपस्थित राहिले जाईल, असे ते म्हणाले. करोनाकाळात बैठकीला गर्दी होणार नाही याची प्रशासनास दक्षता घ्यावी लागणार आहे.

आक्षेपांकडे दुर्लक्ष करून करोना केंद्राचे उद्घाटन

क्रेडाई नाशिकच्या वतीने उंटवाडी रस्त्यावर ठक्कर डोममध्ये उभारलेले करोना काळजी केंद्र करोना रुग्णांसाठी घातक असून त्यामुळे स्थानिकांना धोका निर्माण होणार असल्याची बाब वैद्यकीय व्यावसायिकांनी निदर्शनास आणली होती. परंतु या आक्षेपाकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात या केंद्राचे उद्घाटन करण्याचे निश्चित झाले आहे. शहरात करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. त्यांच्यासाठी रुग्णालये कमी पडत असल्याने वेगळी व्यवस्था करणे आवश्यकच आहे. ठक्कर डोममध्ये कुठेही भिंती नाहीत. मलमूत्र विसर्जनाची कायमस्वरूपी योग्य व्यवस्था नाही. ही व्यवस्था करोना रुग्णांसाठी अतिशय घातक आहे. आतापर्यंतच्या पाहणीत करोनाचा विषाणू पाण्याच्या संपर्कात वाढताना दिसतो, याकडे वैद्यकीय व्यावसायिकांनी लक्ष वेधले होते. स्थानिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे करोना केंद्रासाठी औरंगाबाद रस्त्यावरील मंगल कार्यालये वापरण्याचा पर्याय सुचविला गेला होता. परंतु प्रशासनाने अन्य पर्यायांचा विचार न करता ठक्कर डोमची जागा कायम ठेवली आहे.