News Flash

नाशिकमध्ये थंडीची लाट

कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.

गोदा पात्रालगत शेकोटीचा आनंद घेताना युवक. (छाया - मयूर बारगजे)

तापमान १०.२ अंशांवर

गत पंधरा दिवसांत तापमानातील चढ-उताराची शृंखला कायम राहिल्यानंतर कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. या दिवशी तापमान १०.२ अंश होते. याआधी ९ डिसेंबरला तापमानाची ही पातळी १०.४ अंश इतकी होती. मधल्या काळात ढगाळ हवामानामुळे अंतर्धान पावलेल्या थंडीचे आकाश निरभ्र झाल्यानंतर पुनरागमन झाले. तापमान झपाटय़ाने खाली उतरल्याने सर्वसामान्यांना हुडहुडी भरली आहे. कडाक्याच्या थंडीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू असताना सकाळी शहर व परिसर धुक्याच्या दुलईत लपेटला जातो. दिवसभर थंडगार वारा वाहत असल्याने उबदार कपडे परिधान करणे क्रमप्राप्त ठरले आहे.

दिवाळीनंतर गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची कडाक्याच्या थंडीच्या दिशेने वाटचाल खरे तर डिसेंबरच्या प्रारंभीच सुरू झाली होती. या काळात २ डिसेंबरला १७ अंशांवर असणारे तापमान ९ डिसेंबरला १०.४ अंशांवर आले होते. वातावरणात गारवा भरल्याने बचावासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. थंडी ही नाशिककरांसाठी नवीन नाही. उलट, दर वर्षी तिच्याविषयी प्रत्येकाला उत्सुकता असते. उपरोक्त काळात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्यावर ढगाळ हवामानामुळे दोन दिवसात थंडी अंतर्धान पावली. परिणामी, हुडहुडीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळाले. त्या वेळी तापमानात ७.१ अंशांनी वाढ होऊन ते १७.५ अंशांवर पोहोचले. तापमानाची पातळी खाली येण्यास आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारपासून सुरुवात झाली. गुरुवारी सायंकाळपासून थंडीचे अस्तित्व जाणवू लागले. बोचरा वारा वाहत असल्याने तिची तीव्रता अधिक भासत होती. शुक्रवारची पहाट नीचांकी पातळी गाठणारी ठरली. याआधीची कमी तापमानाची पातळी ओलांडत ते १०.२ अंशांपर्यंत खाली आले.

गुलाबी थंडीने सर्वाना सुखद धक्का दिला. कमालीचा गारवा असल्याने भल्या पहाटे भ्रमंतीसाठी जाणारे नागरिक असो वा शाळेत निघालेले विद्यार्थी बहुतेकांनी उबदार कपडे परिधान केले होते. विविध आस्थापना, कार्यालये व इमारतींच्या सुरक्षा व्यवस्थेची धुरा सांभाळणाऱ्या सुरक्षारक्षकांनी गारव्यापासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळाले. दिवसभर वारा वाहत असल्याने गारव्याचे अस्तित्व जाणवत होते. उत्तरेकडील वाऱ्याचा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या वातावरणावर प्रभाव पडला आहे. आकाश निरभ्र राहिल्यास तापमान आणखी खाली जाईल याकडे हवामानतज्ज्ञांनी लक्ष वेधले. तापमान कमी होण्याची प्रक्रिया कायम राहिल्यास यंदा डिसेंबरमध्ये थंडीची लाट अनुभवण्यास मिळू शकते. एरवी, प्रत्येक हंगामात नाशिकमध्ये किमान दोन ते तीन वेळा थंडीची लाट येत असते. त्या वेळी सलग तीन ते चार दिवस ही लाट मुक्काम ठोकते. पुढील काळात तापमानाची पातळी कशी राहणार यावर त्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 3:36 am

Web Title: cold wave in nashik
टॅग : Cold,Nashik
Next Stories
1 नाशिक, मनमाड स्थानकांचे आधुनिकीकरण
2 क्रीडाक्षेत्रात कारकीर्द घडविण्याची संधी- आनंद खरे
3 मुक्त विद्यापीठाच्या ५० लाख उत्तर पत्रिकांचे ‘डिजिटल स्कॅनिंग’ होणार
Just Now!
X