पलब्ध साठय़ाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे जिल्हधिकाऱ्यांचे आवाहन

नाशिक : जिल्ह्यात मागील दोन दिवस निर्धारित कोटय़ानुसार प्राणवायूचा पुरवठा न झाल्यामुळे गुरुवारी शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये अवघे काही तास पुरेल इतकाच प्राणवायू शिल्लक राहिला. ज्या रुग्णालयांना तुटवडा भेडसावत होता, त्यांची तातडीची गरज दुपापर्यंत पूर्ण करून दिली जाईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. शासकीय मापदंडाच्या तुलनेत रुग्णालयांकडून दुप्पट, तिप्पट प्रमाणात प्राणवायूचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. सर्वत्र प्राणवायूचे संकट असताना रुग्णालयांनी उपलब्ध साठय़ाचे योग्य व्यवस्थापन, वापर करण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे.

शहरातील सिग्मा, नारायणी, रामालय, श्रीगुरुजी अशा काही रुग्णालयांत पुढील काही तास पुरेल इतकाच साठा होता. त्यामुळे काही रुग्णालयांनी रुग्णांना इतरत्र न्यावे, असे सांगण्यास सुरुवात केली. मध्यंतरी इंदिरानगरमधील एका रुग्णालयातून रुग्णांना अशाप्रकारे हलविले गेले होते. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णालय व्यवस्थापनाची तातडीने बैठक झाली.

करोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्राणवायूची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. प्रारंभी जिल्ह्यातून १३८ मेट्रिक टनची मागणी होती. ती कमी करून १२१ मेट्रिक टनवर आणली. सध्या प्राणवायू पुरवठय़ाचे केंद्रीय पद्धतीने व्यवस्थापन होत आहे. जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात दैनंदिन ८५ मेट्रिक टनचा पुरवठा होत आहे. मंगळवारी केवळ ५६ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा झाला. त्यामुळे २५ ते ३० मेट्रिक टनचा तुटवडा झाला. अनेक रुग्णालयांना तो मिळाला नाही. बुधवारीदेखील दोन मेट्रिक टनचा कमी पुरवठा झाल्याचे मांढरे यांनी नमूद केले. प्राणवायू व्यवस्थेवर असणाऱ्या रुग्णांची संख्या सात हजार आहे.

रुग्णालयांनी आपली व्यवस्था तपासणे आवश्यक

प्राणवायू वापराबाबत शासनाचा निकष १० ते २० लिटर प्रतिमिनिट आहे. यात काहीअंशी तफावत मान्य करता येईल. तथापि, काही रुग्णालये १३० ते १५० लिटर प्रतिमिनिट असा वापर करीत आहेत. रुग्णालयांनी वापरात बदल करण्याची आवश्यकता आहे. व्यवस्थेत कुठे गळती आहे काय, याची तपासणी करण्याची सूचना रुग्णालयांना करण्यात आली. डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने याबाबत प्रबोधन करण्याचे मान्य केले. शासकीय, खासगी अशा प्रत्येक रुग्णालयासाठी आता कोटा निश्चित करण्यात आला आहे. जास्तीचा प्राणवायू मिळवण्याचा प्रयत्न होत असून औरंगाबादमधून ४०० सिलिंडर मिळणार आहेत. प्राणवायूचा औद्योगिक वापर थांबविला गेला आहे. औषध कंपन्या वगळता कुठल्याही उद्योगाला तो दिला जात नाही. सध्या तो प्राणवायू वैद्यकीय कारणास्तव वापरला जात असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.