मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नाशिक दौऱ्याचे निमित्त

नाशिक : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी कार्यालयास नवीन साज चढविला जात असून या कार्यालयाचे रुप पालटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची ब्रिटीशकालीन इमारत मुळातच देखणी आहे. काही वर्षांपूर्वी तिचे सौंदर्य अबाधित ठेवून काही कामे केली गेली होती. अलीकडेच कुठेतरी लोंबळणाऱ्या वायरी, रंग उडालेला छताचा काही भाग असे दृश्य दिसत होते. राज्याच्या प्रमुखांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात तसे चित्र दिसू नये, यासाठी खास दक्षता घेतली जात आहे. रंगरंगोटी, वायरचे जाळे नीटनेटके करणे, फुलांच्या कुंडय़ांनी सुशोभिकरण या कामांनी वेग घेतला आहे.

गुरूवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक विभागातील पाच वर्षांतील म्हणजे भाजपच्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेतला जाणार आहे. विभागातील पाच जिल्ह्य़ांसाठी विशिष्ट वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. या काळात राबविलेल्या योजना, त्यांची सद्यस्थिती, त्यावर झालेला खर्च अशा अनेक मुद्यांवर बैठकीत मंथन होईल.

काही वर्षांत मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक किंवा कार्यक्रमासाठी आल्याचे ऐकिवात नाही. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मध्यंतरी ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले होते. तेव्हां जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे छायाचित्र त्यांना भेट स्वरुपात दिले होते. अतिशय प्रशस्त असणाऱ्या या कार्यालयाची रचना अशी आहे की, ते एका छायाचित्रात समाविष्ट होऊ शकत नाही. त्यासाठी खास वेगळ्या पध्दतीचा वापर करून संपूर्ण कार्यालय  एकाच छायाचित्रात बसविण्यात आले होते. बहुदा या छायाचित्रामुळे मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत पाहण्यास उत्सुक असावेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वरील मजल्यावरील सभागृहात आढावा बैठक होणार आहे. गुरूवारी मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक याच ठिकाणी होणार आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रंगरंगोटी, डागडुजी तसेच तत्सम दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

छतावरील काही भागाचा रंग उडालेला होता. त्याची रंगरंगोटी सुरू आहे. काही ठिकाणी वायरचे जंजाळ दृष्टिपथास पडायचे. काही ठिकाणी वायर लोंबकळत होत्या. त्या नीटनेटक्या केल्या जात आहेत. या दौऱ्याने वाहनतळातील झाडांच्या पारांचे भाग्य फळफळले. त्यांची रंगरंगोटी प्रगतीपथावर आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता नियमित स्वरुपाची डागडुजी, रंगरंगोटीची कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार असल्याने परिसर टापटीप ठेवला जात आहे. फुलांच्या कुंडय़ांनी सुशोभिकरण केले जाणार आहे.