नाशिक : सुमारे ११ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सोमवारी जिल्ह्य़ातील महाविद्यालये पुन्हा सुरू झाली. पहिल्याच दिवशी शहरात विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी वर्गात गर्दी करण्यापेक्षा आवारातील कट्टय़ांवरच गप्पांची मैफल जमविल्याचे दिसून आले.

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. त्याअनुषंगाने सोमवारपासून महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या ५० टक्के  उपस्थितीने सुरू झाली. करोनाच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी के लेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक खबरदारी घेत महाविद्यालये सुरू झाली. पंचवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांनी करोना पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील सर्व वर्ग निर्जंतुक करण्यात आल्याचे सांगितले. ५० टक्के उपस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्यांने सामाजिक अंतराचे पथ्य पाळणे आणि त्यांना मुखपट्टी अनिवार्य करण्यात आली आहे. मुखपट्टी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला असल्याचेही त्यांनी नमूद के ले. हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी महाविद्यालयात ज्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक, अशा वर्गातील ५० टक्के  विद्यार्थी बोलावण्यात आल्याचे सांगितले. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्या वर्गाना पूर्ण क्षमतेने बोलावण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आले.

पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी पुढील सात दिवसात ही संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त

के ला. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी वर्गापेक्षा कट्टय़ावर थांबणे पसंत के ले. मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात गप्पांची मैफल रंगत गेली. चेतन आचार्य या विद्यार्थ्यांने खूप महिन्यांनंतर महाविद्यालयात आल्याचा आनंद व्यक्त के ला.

वर्ग नवा असला तरी मित्र-मैत्रिणींशी भेटण्याची हुरहुर होती. एरवीही गाठीभेटी होत असल्या तरी आता अभ्यास आणि गप्पा दोघे एकत्र सुरू होतील याचा आनंद असल्याचे त्याने सांगितले. विद्यापीठाच्या निर्देशानुसार आणि वेळापत्रकानुसार अंतर्गत परीक्षाही सुरू करण्यात आल्या. त्यासाठी एका बाकावर एक विद्यार्थी असे नियोजन करण्यात आले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. नंदू पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.