18 October 2019

News Flash

दसऱ्यामुळे नाशिक सराफ बाजाराला झळाळी 

दसऱ्याला नवीन खरेदी करण्यास विशेष महत्त्व आहे. त्यातही सोने खरेदीसाठी अनेक जण दसऱ्याचा मुहूर्त निवडत असल्याने सराफ बाजार गजबजला.

बांधकाम व्यावसायिकांनाही दिलासा

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सराफ बाजारासह इतर सर्वच दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. गृहकर्ज स्वस्त झाल्यामुळे दसऱ्याचा योग साधत ग्राहकांनी बऱ्यापैकी सदनिकांसाठी नोंदणी केल्याने बऱ्याच दिवसांनी गृहप्रकल्पधारकांमध्ये समाधान पसरले. ही स्थिती दिवाळीपर्यंत कायम राहण्याचा त्यांचा अंदाज आहे.

दसऱ्याला नवीन खरेदी करण्यास विशेष महत्त्व आहे. त्यातही सोने खरेदीसाठी अनेक जण दसऱ्याचा मुहूर्त निवडत असल्याने सराफ बाजार गजबजला. काही दिवसांपासून सोन्याचे वाढणारे दर दसऱ्याला दोन ते अडीच हजारांनी कमी झाल्याने ग्राहकांना हायसे वाटले. मंगळवारी प्रति तोळा २४ कॅरेट सोन्यासाठी रुपये ३८,२००, तर चांदी प्रति किलो रुपये ४६ हजार ५०० असा भाव होता. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून यंदा चोख सोन्याला महत्त्व देण्यात आल्याचे सराफ व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी सांगितले.

दसऱ्यानंतर अवघ्या दोन आठवडय़ांनी दिवाळी सुरू होत आहे. तुळशीच्या लग्नानंतर सुरू होणाऱ्या लगीनसराईच्या पाश्र्वभूमीवर तसेच सोने-चांदीच्या भावातील अस्थिरता पाहता लग्नातील दागिन्यांची आगाऊ नोंदणी करण्यात आली. सराफ व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या सवलतींचा वर्षांव ग्राहकांवर करण्यात आला. वाहन उद्योगातही मंदीचे वातावरण असताना मंगळवारी वाहन बाजारात काहीसे दिलासादायक चित्र राहिले. दुचाकीसह चारचाकी वाहनांसाठी काहींनी आगाऊ नोंदणी केली. अनेक नवीन गाडय़ा थेट शोरूमबाहेर पडल्या.

काही वर्षांपासून मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या गृहनिर्माण क्षेत्रास या दसऱ्याने ऊर्जितावस्था आली. बँकांनी गृहकर्ज काहीसे स्वस्त केल्याने सदनिकांची नोंदणी करण्यासाठी ग्राहक नवीन प्रकल्पस्थळांवर जात असल्याचे चित्र अनेक दिवसांनंतर दिसले. दिवाळीपर्यंत सणासुदीचे दिवस असल्याने गृहप्रकल्प क्षेत्रात बऱ्यापैकी आर्थिक उलाढाल होण्याची आशा आहे.

प्रचाराचा मुहूर्त साधण्याची लगबग

दसऱ्याचा मुहूर्त साधत उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. लघुसंदेशाच्या माध्यमातून मतदार राजाला दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात येत असताना काही उमेदवारांनी घरोघरी जाऊन तर काहींनी कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रचाराचे नियोजन करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

First Published on October 9, 2019 12:44 am

Web Title: comfort builders home loan akp 94