महानगरपालिका निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्ष उमेदवारी अर्जासंदर्भात झालेल्या घोळामुळे हैराण झालेले असताना भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी) ने निश्चित केलेल्या आपल्या १५ उमेदवारांची नावे रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

प्रभाग क्रमांक १० ड मधून सीताराम ठोंबरे, प्रभाग २६ अ मधून अ‍ॅड. तानाजी जायभावे, २६ ब मधून अ‍ॅड. वसुधा कराड हे प्रमुख उमेदवार आहेत. पक्षाच्या नियमानुसार पक्षाची निशाणी देण्याविषयी तांत्रिक अडचण असल्याने प्रभाग २६ मध्ये सचिन भोर हे पुरस्कृत अपक्ष उमेदवार असतील, अशी माहिती पक्षाच्या वतीने डॉ. डी. एल. कराड यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे या सर्वाना नाशिककरांनी संधी दिली. परंतु, त्यांनी निराशा केली. त्यामुळे या सर्व पक्षांना बाजूला करण्याची वेळ आली असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. ‘मतासाठी रुपया देणार नाही व कामासाठी रुपया घेणार नाही’ ही घोषणा आमच्या नगरसेवकांनी प्रत्यक्षात अमलात आणली आहे. मनपाच्या तिजोरीत जमा होणारा कर पैसा परत नाशिककरांच्या दारापर्यंत आणून विकास करण्याचे काम विश्वस्ताप्रमाणे तसेच प्रभागातील नागरिकांच्या गरजा व मागणीनुसार प्राधान्यक्रमाने विकासकामे नगरसेवकांनी केली आहेत. पक्षातर्फे प्रामाणिक, गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसलेले, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्यात आले आहेत. महापालिकेतील टक्केवारी, ठेकेदारी, भ्रष्टाचार व घाणेरडे राजकारण संपवून स्वच्छ व पारदर्शक कारभार, चांगले राजकारण प्रस्थापित करण्यासाठी तसेच तथाकथित स्मार्ट सिटीऐवजी प्रदूषणमुक्त व सुरक्षित, विकसित आणि राजकारणी व गुन्हेगारांच्या विळख्यातून मुक्त व सुरक्षित नाशिक शहरासाठी मतदान करण्याचे आवाहन डॉ. कराड यांनी केले.