पंखे बंद पडल्याने नाशिक-मुंबई त्रासदायक प्रवास

नाशिक : तब्बल ४२ वर्षांनंतर नवीन रूपात दाखल झालेल्या आणि आरामदायी प्रवासाची विविध वैशिष्टय़े सामावणाऱ्या मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसने सोमवारी शेकडो प्रवाशांना अक्षरश: घामाने भिजवून टाकले. नाशिकरोड स्थानक सोडल्यानंतर बहुतांश डब्यातील पंखे अकस्मात बंद पडल्याने कमालीच्या उकाडय़ात पावणे चार तासाचा प्रवास त्रासदायक ठरला.  नवीन रचनेमुळे आधीच डब्यात कोंदट वातावरण, त्यात कमालीची गर्दी आणि पंखेही बंद पडल्याने प्रवासी कमालीचे हैराण झाले होते.

दररोज मुंबई प्रवासासाठी जिल्ह्य़ातील चाकरमानी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांची प्रमुख भिस्त असणारी पंचवटी एक्स्प्रेस गेल्या बुधवारपासून नवीन रूपात धावण्यास सुरूवात झाली. आकर्षक रंग, नावीन्यपूर्ण अंतर्गत सजावट, आरामदायी आसन व्यवस्था, सर्व डब्यांमध्ये जैवतंत्रज्ञानयुक्त स्वच्छतागृहे आदी सुविधांमुळे नवीन रूपातील पंचवटीतील प्रवास अधिक सुखकर होईल ही अपेक्षा फोल ठरली. रेल्वे प्रशासनाने नवीन पंचवटी एक्स्प्रेसमधून आरामदायी प्रवास होईल, असा दावा केला होता. परंतु तो अक्षरश: फोल ठरला.

उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांनी या बाबत तीव्र आक्षेप नोंदविले होते. २१ डब्यांच्या पंचवटी एक्स्प्रेसच्या नव्या अंतर्गत रचनेत डब्यात कोंदट वातावरण वाटते. हवा खेळती राहण्यास पुरेशी जागा नाही. दरवाजाचा आकार लहान झाल्यामुळे हवा खेळती राहत नाही. नव्या आसन व्यवस्थेमुळे सलग पावणे चार तास प्रवास केल्यावर कंबरदुखीचा त्रास होतो, आदी तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. नवीन डबे आणि फलाट यामध्ये कमीत कमी अंतर असणे आवश्यक असते. नव्या पंचवटीत हे अंतर अधिक आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावते, याकडे रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले.

सोमवारी नाशिक-मुंबई प्रवासात प्रवाशांना यापेक्षा विदारक स्थितीला तोंड द्यावे लागले.  वास्तविक, आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी मुंबईला जाणाऱ्यांची संख्या नेहमीच्या तुलनेत अधिक असते.

पंचवटी एक्स्प्रेस नेहमीच्या वेळापत्रकानुसार नाशिकरोड स्थानकात आली. गर्दी असल्याने प्रवाशांनी मिळेल त्या डब्यात जागा पकडण्यास प्राधान्य दिले. वातानुकूलित, पासधारक, आरक्षित आसन व्यवस्था, सर्वसाधारण अशा सर्व डब्यांमध्ये प्रवासी होते. नाशिकरोड स्थानक सोडल्यानंतर बहुतांश डब्यातील पंखे अचानक बंद पडले. काही तांत्रिक कारणास्तव उद्भवलेला दोष काही वेळात दूर होईल अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. टळटळीत उन्हात मार्गस्थ झालेल्या पंचवटीत गर्दीमुळे कमालीचा उकाडा जाणवत होता. पंखे बंद पडल्याने घामाघूम झालेल्या प्रवाशांना कोणी वाली नव्हते. हाती मिळेल त्या साधनाने प्रवासी घाम पुसणे किंवा कागदाद्वारे वारा घेण्याची धडपड करीत होते.

लहान मुलांना सोबत घेऊन निघालेल्या महिलांना हा प्रवास असह्य़ झाला. पंखे बंद असल्याने लहान मुलास घेऊन प्रवास करणे अवघड झाल्याचे प्रवासी रुपाली कदम यांनी सांगितले.

आराम कमी, त्रास अधिक

नव्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये खेळती हवा राहील अशी व्यवस्था नसल्याने कोंदटपणा जाणवतो. सर्वसाधारण बोगीत उभे राहण्यास पुरेशी जागा नाही. त्यात पंखे बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाल्याची तक्रार स्वप्निल चौधरी यांनी केली. पंखे बंद असल्याने प्रवाशांना इंजिनच्या डब्यात बसल्याची अनुभूती मिळाली. मनमाडहून गाडी निघाल्यावर नाशिकरोड स्थानकापर्यंत पंखे सुरू होते. नाशिकरोड स्थानक सोडल्यावर बंद पडलेले पंखे मुंबई गाठेपर्यंत सुरूच झाले नाहीत. नवीन रेल्वेगाडीत आराम कमी आणि त्रास अधिक अशी स्थिती असल्याकडे प्रवासी मनजीतसिंग चावला यांनी लक्ष वेधले.