औद्योगिक वसाहतीतील बॉश (मायको) कारखान्यात वरिष्ठ प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम केल्याचा अनुभव असलेले सतीश (नाना) कुलकर्णी यांची साडेतीन दशकापासून भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून असणारी ओळख त्यांना महापौरपदापर्यंत नेण्यात महत्त्वाची ठरली.

पक्षासह विरोधकांशी स्नेहाचे संबंध ठेवणाऱ्या नानांचे नाव महापौरपदासाठी पुढे आले आणि पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असणाऱ्या फुटीर नगरसेवकांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर, विरोधी शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेऊन नानांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त केला.

अतिशय चुरशीच्या निवडणुकीत हे समीकरण कसे जुळून आले, यावर स्मित हास्य हेच त्यांचे उत्तर होते. सर्वपक्षीयांशी चांगले संबंध निवडणुकीत कामी आले. शिवाय, नानांचे नाव पुढे आल्यावर उमेदवारीवरून पक्षांतर्गत स्पर्धा संपुष्टात आली. ३५ वर्षांपासून ते भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. महापालिकेतील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांची ओळख. १९९७, २००२, २०१२, २०१७ आणि पाचव्यांदा म्हणजे २०१७ मध्ये सर्वाधिक मतांच्या फरकाने ते विजयी झाले. स्थायी समितीचे सदस्य, २०१२ ते २०१४ या काळात उपमहापौर, भाजप गटनेते आणि अलीकडच्या काळात वैद्यकीय साहाय्य आणि आरोग्य समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २००४ आणि २००७ या कालावधीत भाजपचे शहराध्यक्ष म्हणून नानांनी जबाबदारी सांभाळली.

शहरातील खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर जावे यासाठी त्यांनी वंदे मातरम् प्रतिष्ठानतर्फे स्पोर्ट्स शाळेची स्थापना केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी निरामय ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना, प्रभागात सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे त्यांच्यामार्फत सातत्याने आयोजन केले आहे

उपमहापौर भिकूबाई बागूल

उपमहापौरपदी विराजमान झालेल्या भिकूबाई बागूल यांची महापालिकेत निवडून येण्याची तिसरी वेळ आहे. यापूर्वी दोन वेळा त्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. नंतर भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी निवडणूक लढविली. भाजपचे प्रदेश पदाधिकारी सुनील बागूल यांच्या त्या मातोश्री. भिकूबाई यांचे माहेर धुळ्यातील देवपूर हे आहे. जुन्या मॅट्रिकपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. पतीच्या लष्करी सेवेमुळे काही काळ त्यांनी लष्कराच्या शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम केले. यापूर्वी भिकूबाई यांचा मुलगा संजय बागूल यांना स्थायी समितीचे सभापतीपदी काम करण्याची संधी मिळाली होती. तीन वेळा निवडून आलेल्या भिकूबाई यांना मात्र आजवर महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मिळाली नव्हती. उपमहापौरपदाच्या माध्यमातून भाजपने महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.