लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत सहभागी माजी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

 

महाविद्यालयीन विश्वात सबमिशन, असाईनमेंट, प्रोजेक्ट, परीक्षा, व्हायवा या जंजाळातून कलाप्रेमी विद्यार्थ्यांमधील ‘कलावंत’ घडावा यासाठी महत्वाचे माध्यम ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा ठरली आहे. स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष असून आशयघनता, कसदार अभिनय, वैविध्य यामुळे स्पर्धेने नाटय़वर्तृळात वेगळा ठसा उमटवला आहे.  स्पर्धेने अनेक नवे चेहरे रंगभूमीला दिले. स्पर्धेने आम्हांला कलाकार म्हणून घडविले, अशी भावना स्पर्धकांकडून व्यक्त होत आहे.  स्पर्धेचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत असतांना स्पर्धेतून पुढे गेलेल्या कलाप्रेमी विद्यार्थ्यांना याविषयी नेमंक काय वाटतं हे त्यांच्याच शब्दात..

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकांकिका’ स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिके च्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिके त संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

जिद्द, उत्साह जगण्याची नशा

बी. वाय. के महाविद्यालयाची विद्यार्थी प्रिया जैन हिने स्पर्धेसाठी एकांकिका लिहण्याचे काम केले. या विषयी बोलतांना प्रिया सांगते, खरंतर आम्ही कलाकार मंडळी महाविद्यालयात कमी आणि कलामंडळात जास्त असायचो. त्यात लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची घोषणा होण्याआधीपासून स्पर्धा कशी करायची वगैरे चर्चा व्हायला लागायची. लेखक तंत्रज्ञ सर्वाची लगबग जोमात. ही फक्त स्पर्धा नाही, तर महाविद्यालयात स्वतला सिध्द करायची चढाओढ वाटायची.  एवढेच सांगेन स्पर्धा एक नशा आहे. ज्यातून आम्ही घडलो. ती जिद्द, उत्साह जगलो. बाहेरचे काम सुरू झाले, पण आमच्यातला तो स्पर्धक जिवंत आहे. नव्या संघाला जीव ओतून काम करा हाच सल्ला देईल.-प्रिया जैन (बीवायके महाविद्यालय)

गैरसमज दूर

महाविद्यालयीन विश्वात नाटक-एकांकिका स्पर्धा ही ठराविक वर्गाची मक्तेदारी मानली जात होती. मात्र ‘लोकांकिका’ स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या मनातील गैरसमज दुर केला. राजा रंगमंच तुझा आहे ही भावना मनात रुजवली. स्पर्धेने आपला दर्जा आजही टिकवून ठेवला आहे. गेली पाच वर्षे सातत्याने मी या स्पर्धेत सहभागी झालो. स्पर्धेत अभिनयाची वेगवेगळी पारितोषिके मला मिळाली. याच प्रमाणपत्रांच्या आधारे मुंबई विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागात माझा प्रवेश निश्चित झाला आहे. स्पर्धेने नाटय़क्षेत्राकडे ‘करिअर’ म्हणून पाहण्याची डोळस दृष्टी दिली. नव्याने सहभागी होणाऱ्या संघांनी मन लावून काम करा. नाशिकचे नाव मुंबईत गाजवा.– सूरज बोढाई (माजी विद्यार्थी, केटीएचएम महाविद्यालय)

नवोदितांसाठी भक्कम पाया

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेने नाटय़ क्षेत्रात एक भक्कम पाया उभा करून दिला आहे. त्यात स्पर्धेतील सहभाग आणि दिग्दर्शक म्हणून सामाजिक जाणीवा प्रगल्भ केल्या. सलग तीन वर्षे स्पर्धेतून दिग्दर्शन म्हणून काम करतांना माझ्यात अनेक बदल झाले. ऐनवेळी वेळेचा जुगाड तर नेपथ्य रचनेत बदल अशा सर्व गोष्टी ऑन दी स्पॉट कशा करायच्या, हे तंत्र या माध्यमातून समजले. सध्या मुंबईत नाटय़शास्त्राचा अभ्यास सुरू असल्याने यंदा स्पर्धेत सहभागी नाही. महाविद्यालयाच्या संघास मात्र स्पर्धेतील बारकावे सांगत असून एकांकिका उठावदार करण्यासाठी आशयावर काम करण्याचा सल्ला दिला आहे. -आर्या शिंगणे (माजी विद्यार्थिनी, एचपीटी महाविद्यालय)

एक उत्कृष्ठ व्यासपीठ

मागील तीन ते चार वर्षांपासून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कृतार्थ कन्साराने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. बीवायके महाविद्यालयाच्या ‘तुकाराम डाऊनलोडिंग’ एकांकिकेत मी दिग्दर्शन आणि प्रकाश व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली होती. स्पर्धेत नव्या संहितेचा निकष युवा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा आहे. मात्र त्यामुळे काही महाविद्यालयांच्या सहभागावर मर्यादा येतात. नव्या संहितेसाठी मानधन देणे महाविद्यालयांना परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा असूनही त्यांचा संघ सहभागी होऊ शकत नाही. तसेच ही स्पर्धा सर्वासाठी खुली असावी. ती सर्वासाठी खुली झाल्यास स्पर्धेचा दर्जा, मापदंड निश्चित करता येईल. स्पर्धेत काटेकोरपणा असतो. व्यवस्थापनही नेटके असते. प्रत्येक वर्षी निकालात पारदर्शकता असते – कृतार्थ कन्सारा (बीवायके महाविद्यालय)